गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

कोल्हापूर : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला २५ नाही, तर २८ जागांसाठी ठरण्याची शक्यता (Kolhapur Gokul Mahayuti) आहे. यावर्षी पहिल्यांदाच वाढीव जागांसाठी निवडणूक होत आहे.
त्यामुळे प्रत्येक पक्षांसाठी वाढीव जागांसह दोन तज्ज्ञ संचालक आणि शासन नियुक्त एक संचालकांच्या जागांचेही गणित मांडले जाणार आहे.
गोकुळमध्ये आजपर्यंत २१ संचालक निवडून येत होते. या व्यतिरिक्त दोन तज्ज्ञ संचालक आणि एक शासन नियुक्ती संचालक, असे एकूण २४ संंचालक कार्यरत होते. मात्र, अलीकडे झालेल्या बदलानुसार आता २५ संचालक निवडून येणार आहेत. उर्वरित तीन संचालकांना गृहीत धरूनच एकूण २८ जागांचे गणित महायुतीच्या फॉर्म्युल्यात ठरणार आहे. यामुळे इच्छुकांना महायुती करायची आहे; पण वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये माझा समावेश असला पाहिजे, अशी मानसिकता आहे. त्यामुळे अर्ज दाखल केले आहेत. जे होईल ते नंतर होईल, तयारीला लागलेले बरे अशी मानसिकता इच्छुकांनी केली आहे.
महायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य शक्ती पक्ष, असे चार पक्ष एकत्रित आहेत. सध्या सर्वांची ताकद ठरावधारकांच्या माध्यमातून आहे. याचवेळी काँग्रेस आणि वैयक्तिक गट अशा पद्धतीने ठरावधारक विखुरले आहेत. महायुती म्हणून निवडणूक लढविताना प्रत्येक पक्षाला अधिकाधिक जागा हव्या आहेत. त्यासाठी ठरावांचे भांडवल केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात महायुती झाल्यास सर्वच पक्षांना नाराजी पत्करून अनेक इच्छुकांना थांबवावे लागणार आहे.
अशावेळी उर्वरित तीन स्वीकृत जागांचा विचार करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. महायुती झाल्यास एकाच घरातील दोन उमेदवार, आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा, विधानसभा मतदारसंघातील उपयुक्त व्यक्ती, इतर गटातील उमेदवार या सर्वांचा विचार होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षात प्रत्येक गटातील उमेदवार असायला पाहिजे. यातूनच पक्षांतील सर्वच इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी सांगितले आहे. ज्या पक्षांकडे महिलांसह इतर गटांतील जागा येतील त्यांच्या सर्वसाधारण गटातील जागा कमी केल्या जाण्याची शक्यता आहे.
स्वीकृतसाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’
शासन नियुक्तीसह अन्य दोन संचालकांची नावे नेहमी संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर ठरतात. मात्र, आताच्या निवडणुकीत ही नावे निश्चित करूनच पॅनेल होण्याची शक्यता आहे. यासाठी नेत्यांसह इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. तसेच महायुतीत स्थान मिळालेच नाही, तर पर्यायही उपलब्ध असल्याचेही इच्छुकांकडून सांगण्यात येते, तर काहींकडून मी ‘फिक्स’ आहे, असाही विश्वास दाखवला जात आहे.



