Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

समुद्र मुंबईला खरोखरच गिळणार का? 2050 पर्यंत 80 टक्के सखल भाग धोक्यात? शास्त्रज्ञांचा मोठा इशारा

मुंबई शहर हे समुद्र हटवून तयार करण्यात आल्यामुळे वाढत्या समुद्र पातळीचा धोका येथे अधिक आहे. जमीन खचणे आणि नैसर्गिक पाणथळ जागा नष्ट झाल्याने समुद्राचे पाणी शहरात शिरण्याचे प्रमाण वाढणार आहे.

या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) किनारपट्टीच्या भागांचे ‘क्लायमेट-रिस्क असेसमेंट’ सुरू करून तातडीने पर्यावरणीय उपाययोजनांवर भर दिला आहे. दरम्यान, समुद्र मुंबईला खरोखरच गिळणार का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा सायन्य अँगलने प्रयत्न करुयात.

हवामान बदलामुळे ‘समुद्र मुंबईला पूर्णपणे गिळणार का?’ हा प्रश्न आता केवळ चर्चा किंवा भीती उरलेला नाही, तर तो गंभीर वैज्ञानिक संशोधनाचा विषय बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका विशेष रिपोर्टने या धोक्याला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. विज्ञानाचे सिद्धांत आणि जागतिक डेटा काय सांगतो, याचा सखोल आढावा घेणारी ही सविस्तर बातमी. (REF.)

समुद्र पातळी वाढण्याचा नवा जागतिक विक्रम

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या ‘चॅलेंजेस रिलेटेड टू सी-लेव्हल राईज’ या ताज्या विशेष रिपोर्टनुसार, जगभरातील समुद्राची पातळी मानवी इतिहासात कधीही नव्हती इतक्या वेगाने वाढत आहे. 2014 ते 2023 या काळात समुद्राची पातळी दरवर्षी 4.7 मिमीने वाढली, तर 2024 मध्ये या वाढीने 5.9 मिमीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दक्षिण आशियातील मुंबई, कोलकाता आणि ढाका या शहरांना याचा सर्वाधिक फटका बसणार असून, तिन्ही शहरांमधील मिळून सुमारे 1.4 कोटींहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञानाचे सिद्धांत आणि तथ्यांचा आधार

वैज्ञानिक सिद्धांतानुसार, मुंबई बुडण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत – ‘ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढणारी समुद्र पातळी’ आणि ‘लँड सबसिडेन्स’ (जमीन खचणे). इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या अंदाजानुसार, जर कार्बन उत्सर्जन असेच अनियंत्रित राहिले, तर 2100 पर्यंत समुद्राची पातळी 0.5 ते 1 मीटरने वाढू शकते. मुंबईचा बहुतांश भाग हा समुद्र हटवून म्हणजेच सात बेटांना जोडून तयार करण्यात आला आहे. यामुळे नैसर्गिक पाणथळ जागा आणि मिठागरे नष्ट झाली आहेत, जी पूर नियंत्रण पाण्याचे नैसर्गिक शोषक म्हणून काम करायची. परिणामी, हाय टाईड आणि ढगफुटी एकाच वेळी आल्यास मुंबई जलमय होते. (REF.)
मुंबई पूर्ण बुडणार की केवळ पूर येणार?

खगोलशास्त्र आणि हवामान तज्ज्ञांच्या मते, मुंबई ‘एकदम समुद्रात बुडणार’ असे नाही, तर किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये ‘कायमस्वरूपी पाणी साचणे’, चक्रीवादळे, समुद्राचे पाणी शहरात शिरणे आणि पिण्याच्या पाण्यात खाऱ्या पाण्याचे मिश्रण होणे या समस्या प्रचंड वाढणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) क्लायमेट ॲक्शन प्लॅननुसार, जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर 2050 पर्यंत दक्षिण मुंबईसारख्या सखल भागातील 80 टक्के भाग थेट धोक्यात येऊ शकतो.
बृहन्मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये

या वाढत्या धोक्याची दखल घेत BMC ने मुंबईच्या 149 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीचे नवीन ‘क्लायमेट-रिस्क असेसमेंट’ म्हणजेच हवामान जोखीम मूल्यांकन सुरू केले आहे. कोस्टल रोडच्या उभारणीमुळे आणि बदललेल्या जमिनीच्या वापरामुळे किनारपट्टीवर काय परिणाम झाला आहे, याचा अभ्यास या अंतर्गत केला जात असून याचा रिपोर्ट 2027 पर्यंत येणे अपेक्षित आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी मुंबईत तिव्हर जंगलांचे जतन करणे आणि पाण्याच्या निचऱ्याची यंत्रणा सुधारणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *