Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

पुणे : बीड-पुणे नवीन रेल्वेचे उद्‌घाटन गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने एका रेकचे नियोजन केले. आता दुसऱ्या रेकसाठीदेखील मुख्यालय स्तरावर डब्यांची जुळवाजुळव सुरू आहे.

पुणे-बीड रेल्वेची नियमित सेवा २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर बीडहून या रेल्वेची नियमित सेवा २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या नवीन रेल्वेमुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे-बीडदरम्यान सुरू होणाऱ्या या नव्या रेल्वेसेवेची प्रवाशांना बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. या गाडीची नियमित प्रवासी सेवा पुण्याहून २२ सप्टेंबर रोजी सुरू होईल, तर परतीची गाडी बीड स्थानकावरून २३ सप्टेंबर रोजी पुण्यासाठी रवाना होईल. या दैनंदिन सेवेमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक वाढणार असून प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

प्रवासाचा वेळ कमी होणार सध्याच्या वेळापत्रकानुसार, पुणे ते बीड या प्रवासासाठी सात तासांहून अधिक वेळ लागत आहे. मात्र, प्रवाशांचा वेळ वाचावा आणि प्रवास अधिक वेगवान व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावर काही ठिकाणी वेगाची मर्यादा ठरली आहे. काही ठिकाणी रेल्वे ५० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे, तर काही ठिकाणी ७० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे. ही गाडी भविष्यात ताशी ११० किलोमीटर धावावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

असे आहे वेळापत्रक :

पुणे ते बीड (गाडी क्र. ११४३३) : ही गाडी पुण्याहून रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि सकाळी सहा वाजता बीडला पोहोचेल. बीड ते पुणे (गाडी क्र. ११४३४) : ही गाडी बीडहून रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल, पुण्याला पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. या रेल्वेला सुमारे ७ तास लागतील, नंतर मात्र यात १ तासाची बचत केली जाणार असून पुणे-बीड ही रेल्वे सहा तासांत हे अंतर कापणार आहे.

या स्थानकांवर थांबा : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रस्ता, अहिल्यानगर, नारायणडोह, नवीन आष्टी, अमळनेर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *