नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई! 48.81 लाखांचा अन्नसाठा जप्त, फ्राईड ओनियन, खाद्यतेलाचा समावेश

नाशिक: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नाशिकमध्ये केलेल्या धडक कारवाईत तब्बल ४८ लाख ८१ हजार ९२० रुपयांचा तळलेला कांदा जप्त केला आहे. सय्यद पिंप्री येथील ‘मे. छाया ॲग्री प्रा. लि.’ या कारखान्यावर गुरुवारी (दि. १७) छापा टाकण्यात आला. या कारवाईत निकृष्ट दर्जाच्या तेलात तळलेला १२ हजार किलोहून अधिक ‘बेरिस्टा’ अर्थात ‘फ्राइड ओनियन’ आणि तेल जप्त करण्यात आले. प्रशासनाने संबंधित कारखान्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
तपासणीदरम्यान कारखान्यात अत्यंत अस्वच्छ आणि बकाल परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले. कांदा तळण्यासाठी वापरले जाणारे खाद्यतेल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, ते वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काळ्या ऑइलसारखे दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिर्याणी हाऊस,
फूड सेंटर्सना पुरवठा
हा ‘फ्राइड ओनियन’ नाशिकमधील अनेक हॉटेल्स, बिर्यानी सेंटर्स आणि फास्ट फूड सेंटर्सना पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशसह इतर राज्यांतही तो पाठवला जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
संबंधित कारखान्यात अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि मानवी आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या निकृष्ट तेलाचा वापर करून ‘बेरिस्टा’ तयार केला जात होता. कारखान्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे. – संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी
वस्तू— वजन— मूल्य
बेरिस्टा (तळलेला कांदा)— १२,००८ किलो— ४८ लाख ३ हजार २०० रु.
रिफाइन्ड सूर्यफूल तेल— ३२८ किलो— ७८ हजार ७२० रु.
तर दुसरीकडे, प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा सहा तास पाठलाग करून एक कोटी १३ लाखाचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी (१९ सप्टेंबर) जप्त केला. या प्रकरणी चौघांसह एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास कारवाई सुरू झाली. मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने एक ट्रक भिवंडी-ठाण्याच्या दिशेने जाणार असल्याने तिथे पाळत ठेवण्यात आली. मात्र, ट्रकचालक अचानक मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याकडे निघाला. ही बाब लक्षात येताच प्रसंगावधान राखून अधिकाऱ्यांनी पाठलाग केला. ठाणे विभागाचे पथक मुरबाडकडे गेले आणि पुण्याचे पथक राजगुरुनगरला थांबले. राजगुरुनगर टोलनाक्यापुढे ट्रक पकडण्यात आला.



