Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

दुष्काळाचा प्राथमिक अहवाल पुढील आठवड्यात, तातडीने मदतीचा प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंं आश्वासन

नागपूर – दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून सर्वच मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात अभ्यास करून प्राथमिक अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील आठवड्यात प्राथमिक अहवालाचा

आढावा घेणार असून पंचनाम्यानंतर तातडीची मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

यावर्षी ‘एल निनो’चे संकट येणार असल्याची कल्पना असल्याने वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. चाऱ्याची लागवड करून ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध’ ५ ऑक्टोबरपर्यंतचे पंचनामे झाल्यानंतर मदतीबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवावा लागेल.त्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. नुसता दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करून राजकारण करण्यात काही उपयोग नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या मदतीची वाट न पाहता जी काही मदत करता येईल, ती करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठवाड्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तिथली धरणे छोटी आहेत, त्यामध्ये पाणी कमी आहे. मोठ्या धरणांचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवले आहे, असेही ते म्हणाले.

‘प्रशासनाने अधिक संवेदनशील राहावे’ नांदेडमधील दुष्काळी आढावा बैठकीत नेतेमंडळी आणि अधिकाऱ्यांनी काजू, बदामावर ताव मारल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, प्रशासनाने अशा गोष्टी प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत. साधारणपणे आपल्याकडे बैठकीत सुका मेवा ठेवण्याची पद्धत आहे. परंतु, प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन संवेदनशील राहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची विरोधकांना सवय आहे, हे काही योग्य नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *