बाजार उघडताच धडकली आनंदवार्ता! सोन्याचा भाव गडगडला, चांदी 6 हजारांनी आपटली; गुंतवणूकदारांची पंचाईत…

गेल्या वर्षभरात रॉकेटच्या वेगाने फिनिक्स भरारी घेतलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना आता उतरती कळा लागली आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत सतत घसरणीचा कल कायम असून सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर दबाव राहिला.
अमेरिकेच्या रोजगारासंबंधी दमदार आकडेवारीमुळे ट्रेझरी यील्ड्स आणि डॉलर मजबूत झाले परिणामी, फेडरल रिझर्व्हकडून लवकरच व्याजदर कपात होण्याची अपेक्षा कमी झाली.
बाजार उघडताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्या, ज्यामुळे महागाईची चिंता वाढली असून अमेरिकेच्या मजबूत आर्थिक आकडेवारीने दीर्घकाळ व्याजदर उच्च राहण्याच्या अपेक्षांना खतपाणी घातले. मध्य पूर्वेतील भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर 8 जून रोजी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण झाली.
सोमवार, आठवड्याच्या पहिल्याच व्यापार दिवशी, बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे जुलै फ्युचर्स 1.52 टक्के किंवा 1836 रुपयांनी घसरून 1.53 लाखांवर उतरले तर बाजाराच्या सुरुवातीला चांदीचा वायदा दर झटक्यात 6266 रुपयांनी घसरून 2.42 लाखांवर खाली आला. यासोबतच मुंबईत सोन्याचे (22 कॅरेट) दर 1,11,992 रुपये प्रति 8 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचे दर 1,22,176 रुपये प्रति 8 ग्रॅम आहेत.
याशिवाय इस्रायलने इराणमधील लक्ष्यांवर लष्करी हल्ल्यांची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात सोन्याच्या किमती कमकुवत होत गेल्या ज्यामुळे मध्य-पूर्वेतील नाजूक युद्धविराम संपुष्टात येण्याची चिंता वाढली. जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.7% पर्यंत घसरून प्रति औंस 4,300 डॉलरच्या जवळपास पोहोचली असून एप्रिलच्या सुरुवातीला युद्धविरामानंतर पश्चिम आशियातील तणावात सर्वात मोठी वाढ झाली असताना गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूंच्या दरात जवळपास 5% घट नोंदवली गेली.
पश्चिम आशियात सोमवारी पुन्हा एकदा इस्रायलने लेबनॉनवर हल्ला करून जगाचे टेन्शन वाढवले. इराणमधून इस्रायलच्या भूभागाच्या दिशेने डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे रोखल्यानंतर, इस्रायली दलांनी पश्चिम आणि मध्य इराणमधील लष्करी तळांवर हल्ले केल्याची इस्रायलच्या संरक्षण दलांनी माहिती दिली.



