Navgan News



Add Space

क्राईम

तरुणीचा दोन वेळा सौदा आणि गर्भपात, तिसऱ्यांदा करायला गेले, पण…

Crime News : स्त्रियांवरील अन्यायाच्या घटना थांबताना दिसत नाहीत. कधी हुंडा दिला नाही म्हणून हत्या, तर कधी कुणाच्या वासनेची शिकार. अशा घटना आजूबाजूला घडत असतानाच एक विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे.

महिला शोषणाची ही एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना आहे. एका तरुणीने गावातीलच तीन जणांवर लग्नाच्या बहाण्याने फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ही घटना आहे.

पहिला नवरा दारुच्या आहारी

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यांच्या आदेशानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पैशांच्या हव्यासापोटी या तरुणीची मानवी तस्करी करून तिची दिशाभूल करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी तिला आधी आमिष दाखवून हरियाणात नेले आणि तिथे एका तरुणाशी तिचे लग्न लावून दिले. काही काळ ती सासरी राहिली, मात्र तिचा पती दारू पिऊन तिला बेदम मारहाण करत असल्याने तिचे जगणे असह्य झाले.

दुसरे लग्नही ठरले भीतीदायक

यानंतर तिने आपली ही व्यथा लग्न लावून देणाऱ्या मध्यस्थांना सांगितली. मात्र, त्यांनी तिला मदतीचा हात देण्याऐवजी, तिच्या भविष्याची किंवा संमतीची कोणतीही पर्वा न करता, तिचा राजस्थानमधील दुसऱ्या एका तरुणाशी बळजबरीने विवाह लावून दिला. राजस्थानमधील दुसऱ्या पतीसोबत ती सुमारे दहा महिने राहिली आणि यादरम्यान ती गरोदरही राहिली. मात्र, तिच्या पहिल्या लग्नाचा वाद आणि न्यायालयातील खटल्याची माहिती देऊन आरोपींनी तिच्या दुसऱ्या पतीचे कान भरले आणि त्याला भडकावले.

अखेर पोलिसांकडे तक्रार

यानंतर सासरच्या लोकांनी बळजबरीने तिचा गर्भपात केला आणि तिला घरातून हाकलून दिले. या संकटात हतबल झालेली तरुणी पुन्हा त्या मध्यस्थांकडे मदतीसाठी गेली असता, त्यांनी मदत नाकारून तिचे तिसरे लग्न लावण्याची तयारी सुरू केली. या चक्रव्यूहातून कशीबशी सुटका करून घेत तरुणीने थेट गोरखपूर गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *