Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर ‘गोवा रक्षण यात्रा’

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावे, यासाठी प्रयत्न सुरूच ठेवण्याचा निर्णय काँग्रेस गाभा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘गोवा रक्षण यात्रे’च्या नियोजनावर बैठकीत अंतिम चर्चा करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
काँग्रेस भवनात शनिवारी सकाळी गाभा समितीची बैठक पार पडली. त्यानंतर चोडणकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना ही माहिती दिली. काँग्रेसने सर्व मतदारसंघांत संघटनात्मक बांधणीवर सध्या भर दिला आहे. ‘गोवा रक्षण यात्रे’च्या निमित्ताने प्रत्येक गटाकडे जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, त्याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला.
भाजपविरोधी आघाडी भक्कम करण्यासाठी काँग्रेसचे दरवाजे समविचारी पक्षांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, जनतेच्या अपेक्षेनुसार आघाडी करण्यासाठी काँग्रेसची कवाडे सर्व समविचारी पक्षांसाठी खुली आहेत. आघाडीची मागणी जनतेकडून होत आहे, आमच्याकडून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींना निमंत्रण
कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख यांनी सांगितले की, २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पणजीतील आंबेडकर उद्यानापासून ‘गोवा रक्षण यात्रे’ला सुरुवात होईल. २३ सप्टेंबर रोजी कुंभारजुवे मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यात्रेत सहभागी होतील. यात्रेत १०० कायमस्वरूपी कार्यकर्ते सहभागी होणार असून, ते यात्रा सोडून अन्यत्र जाणार नाहीत. ताळगाव येथे २२ सप्टेंबर रोजी यात्रेचा रात्रीचा मुक्काम असेल.
महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत सहभागी होण्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही निमंत्रित करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले. ही यात्रा २२ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांतून जाणार आहे. दरम्यान, या बैठकीस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, एम. के. शेख, दत्ता नायक आणि सुनील कवठणकर उपस्थित होते.
‘त्या’ फलकावर युरी काय म्हणतात?
गोवा फॉरवर्ड पक्ष (जीएफपी) आणि आम आदमी पक्ष (आप) यांची चिन्हे असलेल्या ‘त्यांना तुम्हाला तिसऱ्यांदा फसवू देऊ नका’, अशा आशयाच्या फलकांबाबत विचारले असता विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, भाजपचा पराभव करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. लक्ष विचलित करणाऱ्या इतर गोष्टींवर भाष्य करण्याची आमची अजिबात इच्छा नाही.



