राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर, केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवावा लागेल- चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे. पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय मदत करायची? यावर निर्णय घेतला जाई. त्यासाठी केंद्राला काही प्रस्ताव पाठवावे लागतील.
काही मदत राज्याला करावी लागेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
राज्यातील दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते आज (दि. १८ सप्टेंबर) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी, कृषी विभाग, मदत व पुनर्वसन विभाग यांनी पूर्णवेळ पंचनाम्याच्या आधारावर काम करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा विषय प्राधान्याने घेतला आहे. दुष्काळ हा गंभीर विषय आहे. मुख्यमंत्री फडणवीस संवेदनशील आहेत. त्यांनी याबाबत प्रशासन आणि सर्व विभागांना कडक निर्देश दिले आहेत, असे महसूलमंत्र्यांनी सांगितले.
प्राथमिक अहवाल आला आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर त्या आधारावर कशा उपाययोजना करायच्या? यावर निर्णय घेतला जाईल. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनाही सूचना दिल्या आहेत. वस्तुस्थितीची पाहणी करा. सर्व आमदारांनादेखील त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुष्काळावर उपाययोजना करायच्या असतील तर शेतकऱ्याला पूर्ण मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांना मजबूत उभे केले पाहिजे. यासाठी काही उपाययोजना करायच्या असतील तर संपूर्ण आकडेवारी लागेल. त्यासाठी सर्वेक्षण सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. मी स्वतः महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जाऊन पाहणी करणार आहे. दुष्काळाची गंभीरता किती आहे? यावर निर्णय घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.
चाऱ्या छावण्यांमध्ये भ्रष्टाचार
याआधी चाऱ्या छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मागच्या वेळी चारा छावण्या मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या होत्या. त्यात काही मक्तेदार लोकांनी छावण्या घेतल्या होत्या. त्यात भ्रष्टाचार केला होता. पण यावेळी कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही. ज्या ठिकाणी चारा छावण्या सुरु करायच्या आहेत; त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
‘कुत्रिम पावसाचा प्रयोग कधीही यशस्वी झाला नाही’
कुत्रिम पावसाचा प्रयोग याआधी कधीही यशस्वी झालेला नाही. पण गणरायाकडे प्रार्थना केली आहे की या आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा परतीचा पाऊस चांगला झाला तर दुष्काळाचे सावट काही प्रमाणात कमी होईल. अजून परतीच्या पावसाचा वेळ आहे. यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल, अशा आशा बावनकुळेंनी व्यक्त केली.
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ‘दुष्काळ परिस्थितीत राजकारण…’
राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यावर बावनकुळ यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. पण दुष्काळ परिस्थितीत करण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी आधीच मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभाग, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, मदत आणि पुनर्वसन विभागाला शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे बावनकुळे म्हणाले.



