शेतकऱ्यांच्या बांधावरच पोहोचणार; कृषीमंत्री Dattatray Bharne यांचा मराठवाडा-विदर्भ दौरा

पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील काही भागांत पिकांवर संकट ओढवले असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध जिल्ह्यांचा ते १९ आणि २० सप्टेंबर रोजी दौरा करणार असून, या दौऱ्यात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासोबतच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ शासकीय अहवालांच्या आधारे निश्चित न करता मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिले होते. या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री भरणे यांचा दोन दिवसांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी कृषीमंत्री नांदेड, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांना भेट देणार आहेत. सकाळी १० वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर विभागातील पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीला संबंधित पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सकाळी ११.३० वाजल्यापासून भरणे प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील पुयणी, हिंगोली जिल्ह्यातील बोराला आणि हिवरा तसेच वाशिम जिल्ह्यातील झोडगा, सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा आणि खेरडा या गावांना ते भेट देणार आहेत. या गावांमध्ये शेतांवर जाऊन पिकांची स्थिती, पावसाअभावी झालेला परिणाम आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती ते घेणार आहेत. दौऱ्यानंतर कृषीमंत्री अकोला येथे मुक्काम करणार आहेत.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, २० सप्टेंबर रोजी अकोला येथे अमरावती महसूल विभागाची आढावा बैठक होणार आहे. सकाळी १० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात ही बैठक होईल. त्यानंतर दुपारी १२.०५ वाजता कृषी विद्यापीठातील उद्घाटन आणि शिवार फेरी कार्यक्रमात कृषीमंत्री सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अडचणीत असून शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर केला जाईल आणि त्यानुसार आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
भरणे यांच्या या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील बाधित शेतकऱ्यांच्या समस्या थेट शासनाच्या निदर्शनास येणार असून, नुकसानग्रस्त भागासाठी मदत आणि प्रशासकीय उपाययोजनांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



