
नाशिक मालेगाव तालुक्यातील मोहपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वनजमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि अतिक्रमणधारकांमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
संबंधित वनक्षेत्रावर २००५ पूर्वी अतिक्रमण होते की नाही, याची उपग्रह प्रतिमांच्या आधारे पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच, वनहक्क दावे मंजूर नसलेल्या क्षेत्रावर झालेल्या पीकपेरणीची तपासणी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार आणि सहाय्यक वनसंरक्षकांना दिल्या.
मोहपाडा ग्रामस्थांनी फेटाळण्यात आलेले वनहक्क दावे असलेल्या व्यक्तींचे अतिक्रमण तत्काळ हटविण्याची मागणी केली. दुसरीकडे, अतिक्रमणधारकांनी संबंधित क्षेत्रात उभे पीक असून, वनहक्क दाव्याबाबत विभागीय समितीकडे अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले. त्याचा निर्णय होईपर्यंत अतिक्रमण हटवू नये, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपवनसंरक्षक, नाशिक पूर्व, राकेश शेपट, माजी आमदार जे. पी. गावित, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, ‘आम्ही मालेगावकर’ विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, मोहपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान बोरकर, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरकर, पोलिस पाटील चैत्राम बोरकर, उपोषणकर्ते संतोष बोरकर, सीताराम बोरकर, योगेश बिचकुले, त्र्यंबक आयनर, सोपान करगळ, वनपट्टेधारक, मोहपाडा-अस्ताने ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, वनपाल, वनरक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वनदावे संदर्भातील समितीचे सदस्य उपस्थित होते.
श्री. गावित यांनी भूमिहीन आदिवासी आणि इतर पात्र व्यक्तींना वनहक्क कायद्यानुसार जमीन मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून लढा देत असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंनी समन्वय ठेवून योग्य निर्णय घ्यावा, भूमिहीनांना जमीन आणि पशुपालकांना चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
निखिल पवार यांनी पात्र लाभार्थ्यांना वनपट्टे देण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र अपात्र दावेदारांचे अतिक्रमण हटवावे, पात्र वनपट्टेधारकांच्या क्षेत्राचे मोजमाप व सीमांकन करावे आणि उर्वरित क्षेत्रात वनीकरण करावे, अशी मागणी केली. वनहद्दीलगतच्या गावांत चराई क्षेत्र विकसित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मोहपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान बोरकर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरकर यांनी वनपट्टेधारक हे मूळचे अस्ताने गावातील रहिवासी असल्याने त्यांना अस्ताने गावाच्या हद्दीत वनपट्टे द्यावेत, अशी भूमिका मांडली.



