Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

रोजगार महाकुंभासाठी व्यापारी व औद्योगिक क्षेत्राचा सहभाग वाढवा

रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी व औद्योगिक क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच एमआयडीसीच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन २९ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १० ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे मेळावे होणार आहेत. या रोजगार मेळाव्यांसाठी जिल्ह्यातील विविध उद्योग, व्यापारी आस्थापना आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती सादर करावी, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

स्थानिक उद्योग व व्यापारी आस्थापनांमधील उपलब्ध रोजगाराच्या संधी अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचविणे, आवश्यक मनुष्यबळाची मागणी संकलित करणे आणि रोजगारदाते व नोकरी इच्छुक उमेदवार यांच्यात प्रभावी समन्वय साधणे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रोजगार महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापारी व औद्योगिक क्षेत्राने आवश्यक सहकार्य करावे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.यावेळी एमआयडीसीचे अध्यक्ष अंगद राऊत व पदाधिकारी यांच्यासह व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष ठाकूर व पदाधिकारी, एमआयडीसीचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मेळाव्याची व्यापक प्रसिद्धी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांनी २९ सप्टेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यांचा लाभ घ्यावा, तसेच विविध आस्थापनांनी सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या मार्गदर्शन अधिकारी वैशाली पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *