जेन झी’चा विद्रोह विनाशाकडे जाणारा नसावा ! – योगेश सोमण, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

सांगली – ‘जेन झी’ पिढीशी योग्य संवाद साधून त्यांच्यात विश्वासाची भावना निर्माण केल्यास आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिल्यास त्यांना विध्वंसक मार्गापासून परावृत्त करता येऊ शकते.
आंदोलनाच्या नावाखाली होणारा गोंधळ हा कधीकधी पूर्वनियोजित कट असावा, अशी शंका येते; त्यामुळे विद्रोह हा कधीही विनाशाकडे जाणारा असावा, हे सूत्र ध्यानात ठेवले पाहिजे, असा मोलाचा विचार ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे अध्यक्ष योगेश सोमण यांनी येथे व्यक्त केला.
‘ल.वि. तथा बाळासाहेब गलगले फाऊंडेशन’द्वारे सांगली येथील ‘विलिंग्डन महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहा’त नुकत्याच आयोजित ‘बाळासाहेब गलगले स्मृती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी ‘विकसित भारताच्या निर्मितीत ‘जेन झी’चे योगदान’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ‘सांगली अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष गणेश गाडगीळ आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती खाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्यात सामाजिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या ८ मान्यवरांना ‘बाळासाहेब गलगले स्मृती सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
विनायक माईणकर (मिरज-धर्मरक्षक), प्रा. डॉ. संदीप पाटील (ईश्वरपूर-सहकार सेवा), संजय भिंगारदिवे (नगरसेवा), संजय चव्हाण (विसावा मंडळ-क्रीडा सेवा), दिनेश हसबनीस (शिराळा-पत्रकारिता सेवा) शाहीर शिवतेज जाधव (जत-शाहिरी सेवा), ऋषिकेश ऐनापुरे (पर्यावरण सेवा), दत्तात्रय कुलकर्णी-बोरगावकर (आरोग्य सेवा). ‘फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी आगामी वर्षापासून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही विशेष पुरस्कार चालू करण्याची घोषणा केली. कृष्णात कदम यांनी प्रास्ताविक केले, वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर सुहास कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



