Youngest Indian Shooter : अवघ्या १०व्या वर्षी नायराचा राष्ट्रीय विक्रम, राष्ट्रीय नेमबाजीसाठी पात्र ठरणारी वयाने सर्वात लहान नेमबाज

वयाच्या अवघ्या १० वर्षे आणि तीन महिन्यांत दिल्लीच्या नायरा शर्मा हिने भारतीय नेमबाजीमध्ये नवा इतिहास घडवला आहे. राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणारी ती भारतातील सर्वांत लहान नेमबाज ठरली आहे.
नायराने भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरशालेय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३६३ गुण मिळवत राष्ट्रीय स्पर्धेतील स्थान निश्चित केले.
नायराचा नेमबाजीतील प्रवासही तितकाच वेगवान आहे. तिने याच वर्षी जूनमध्ये दिल्ली राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून स्पर्धात्मक नेमबाजीत पदार्पण केले. त्यानंतर जुलैमध्ये डेहराडून येथे झालेल्या इंडिया ओपनमध्ये तिने सहभाग घेतला. भोपाळमधील स्पर्धा ही तिची केवळ तिसरी स्पर्धा होती. मात्र, याच तिसऱ्या स्पर्धेत तिने अशी कामगिरी केली की थेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे तिकीट मिळवले.
नायरा सध्या दिल्लीतील टॉपगन नेमबाजी अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. स्पर्धात्मक नेमबाजीला सुरुवात करून अवघे काही महिने झाले असतानाच राष्ट्रीय पातळीवर पात्रता मिळवणे ही तिच्या कारकिर्दीची विलक्षण सुरुवात मानली जात आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा याच वर्षाच्या उत्तरार्धात होणार असून, त्यासाठी नायराची तयारी आता सुरू झाली आहे.
नायराचे वडील प्रशांत शर्मा यांनी या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. नायराने मिळवलेले यश हे तिची मेहनत, शिस्त आणि जिद्द यांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टॉपगन नेमबाजी अकादमीकडून मिळणारे मार्गदर्शन आणि सहकार्यही तिच्या प्रगतीत महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले.



