
सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील वातावरण अतिशय संवेदनशील असताना अंबाजोगाई शहरात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या मोरेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी घडली.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरूवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर गावातील काही लोकांनी लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे. २४ तासांत दोन गंभीर घटना उघडकीस आल्याने बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेवाडी परिसरातील माऊलीनगर येथील एका घरावर माथेफिरू तरुणाने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी घराच्या खिडकीवर लागल्याने कोणासही इजा झाली नाही. गोळीबारानंतर त्या तरुणाने घटनास्थळाहून पलायन केले. सदरील तरुण रेणापूर येथील रहिवासी असून ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंबाजोगाई शहर पोलीस या तरुणाचा कसून शोध घेत असून त्याला अटक झाल्यानंतरच या घटनेमागचे खरे कारण समोर येऊ शकणार आहे.
आष्टी तालुक्यात दोन भावांची हत्या
दरम्यान, आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.