ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
सरकार १५०० रुपये देऊन बहिणींचे तोंड बंद करू पाहत आहे का?हा निव्वळ पैशांचा माज आणि सत्तेची मस्ती आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात…

राज्यात महिला आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्येने सर्वच हादरले.
या प्रकरणी 65 वर्षांच्या विकृताला अटक करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र संतप्त झाला आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. सरकार १५०० रुपये देऊन बहिणींचे तोंड बंद करू पाहत आहे का? असा सडेतोड सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली. पुण्यातील त्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित या सरकारची लाडकी बहीण असेल. देवेंद्र फडणवीस तिच्या खात्यात १५०० रुपये टाकत असतील. पण त्या १५०० रुपयांच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिला आहे का? तुम्हाला आम्ही पैसे देतोय, त्यामुळे आता बहिणींनी तोंड बंद ठेवावे, असे हे सरकार सुचवत आहे. हा निव्वळ पैशांचा माज आणि सत्तेची मस्ती आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.
यावेळी संजय राऊतांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य केले. ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याची हिंमत नराधमांमध्ये येते, कारण त्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही. या सर्व परिस्थितीला थेट राज्य सरकार आणि गृहमंत्री जबाबदार आहेत. हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेले नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
यासोबतच संजय राऊत यांनी विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातील महिलांनाही या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सांगितले. “महाराष्ट्रातील माता आणि भगिनींनी आता या सरकारविरुद्ध बंड केले पाहिजे. त्यांना जाब विचारला पाहिजे. केवळ १५०० रुपयांच्या मदतीने सुरक्षेचा प्रश्न सुटणार नाही,” असेही संजय राऊत यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या ठिकाणी एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने अत्याचार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मुलीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. हा आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचाच असल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक पोलिसांनी वेगाने हालचाली करत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या घटनेवरून विरोधकांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सत्ताधारी आणि गृहखात्यावर जोरदार टीका केली जात आहे.



