IIM नागपूरच्या तज्ज्ञ पथकाने केले पर्वरी उड्डाणपुलाच्या सुरक्षेचे स्कॅनिंग; अडचणींची प्रत्यक्ष तपासणी

पर्वरी येथील नव्या एलिव्हेटेड कॉरिडोरवर अल्पावधीतच घडलेल्या प्राणघातक अपघातांच्या पार्श्वभूमीवर आयआयएम, नागपूरच्या तज्ज्ञ पथकाने शनिवारी मार्गाची सखोल पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेतला.
अपघातप्रवण क्षेत्रे, तीव्र वळणे, प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग, तसेच दृश्यमानतेशी संबंधित अडचणींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर लगेचच अपघात घडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॉरिडोरवरील वेग नियंत्रण, वळणांची रचना, सिग्नेज आणि चालकांना मिळणाऱ्या सूचनांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, याबाबत पर्वरीचे आमदार मंत्री रोहन खंवटे यांनीही नाराजी नोंदवली होती. तज्ज्ञ पथकाने विविध ठिकाणी जाऊन रस्त्याची बांधणी, वाहनांची हालचाल आणि संभाव्य धोकादायक बिंदूंचा बारकाईने अभ्यास केला. अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना तातडीने राबविता येतील, याबाबतही प्राथमिक निरीक्षणे नोंदविण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्बंध लागू केले असून दुचाकी वाहनांना उड्डाणपुलावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच वाहनांच्या वेगावर मर्यादा निश्चित करण्यात आली असून इंटरसेप्टिंग रडार, अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुधारित सिग्नेज उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पाहणीच्या आधारे तज्ज्ञांकडून लवकरच अहवाल सादर होण्याची अपेक्षा असून, त्यानुसार कॉरिडोरवरील त्रुटी दूर करून वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.
पर्वरी कॉरिडोरवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलत दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी, वेगमर्यादा, इंटरसेप्टिंग रडार आणि अतिरिक्त कॅमेरे यांसारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. संपूर्ण मार्गावर वेगमर्यादा कठोर केली आहे.
ये-जा मार्गाबाबत पुढच्या ४८ तासांमध्ये होणार निर्णय
पाहणीवेळी पथकाने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षित वापराला प्राथान्य देत दोन्ही मार्ग ४८ तासांत खुले करण्याबाबत विचारविनिमय केला. अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपुलावर दुचाकी प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक अडचणींचा विचार करून संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा पुनर्विचार सुरू आहे. स्थानिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीच्या उपाययोजना करून दोन्ही मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यावर प्रशासनाचा भर आहे. दरम्यान, पुलावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक तपासणी अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



