संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवा! पर्यावरणप्रेमी उतरले रस्त्यावर, वनजमिनीच्या टीडीआरला स्थगितीची मागणी

ठाणे – येथील मानपाडा टिकूजीनीवाडी भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनजमिनीला ‘जैवविविधता उद्याना’चे आरक्षण नकोच, या मागणीसाठी पर्यावरणप्रेमींनी शनिवारी जनआंदोलन केले.
हि जमीन वनविभागाच्याच ताब्यात ठेवावी आणि न्यायालयीन अंतिम निकालापर्यंत टीडीआरला स्थगिती देऊन कोणतेही काम सुरू करू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील वनक्षेत्र, जैवविविधता आणि वन्यजीवांचे अधिवास सुरक्षित ठेवण्याबरोबरच वनजमिनीच्या कथित हस्तांतरणाच्या मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमींनी शनिवारी जनआंदोलन केले. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवा’ या अभियानांतर्गत हरी ओम ट्रेकर्ससह विविध पर्यावरणप्रेमी आणि नागरिक सहभागी झाले होते. वनक्षेत्रावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण, अनियंत्रित बांधकाम अथवा व्यावसायिक वापर होऊ नये, अशी मागणी केली. टिकुजीनीवाडीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकाळी साडेसात वाजता हे आंदोलन करण्यात आले. ‘जंगल वाचवा, ठाण्याचा श्वास वाचवा’ आणि ‘राष्ट्रीय उद्यान वाचवा, निसर्गाचा वारसा जपा’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी जंगल संवर्धनाचा निर्धार केला. हे आंदोलन स्वप्नील महिंद्रकर आणि विजय रांजणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
ठाण्याच्या जंगलाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, आंदोलनामागे वनजमिनीशी संबंधित टीडीआरचा मुद्दाही प्रमुख असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ वनविभागाच्या ताब्यात असलेल्या जागेला ठाणे महापालिकेने ‘जैवविविधता उद्यान’ शहर आरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला. या जागेच्या मोबदल्यात खासगी कंपनीला सुमारे ३७०० कोटी रुपयांचा टीडीआर देण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाला वनविभागाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. वनजमीन ही केवळ प्रशासकीय किंवा आर्थिक व्यवहाराचा विषय नसून शहराच्या पर्यावरणीय भवितव्याशी निगडित असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. जंगलाचा नैसर्गिक अधिवास, जैवविविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित जागा वनविभागाकडेच कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
या जागेसंदर्भात वनविभाग सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या विषयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत या जागेचा टीडीआर स्थगित करावा. तसेच या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम सुरू करू नये.



