मुंबईजवळ तस्करांचे जहाज पकडले, भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

अरबी समुद्रातून मुंबईच्या किनाऱ्यावर होणाऱ्या तस्करीला भारतीय तटरक्षक दलाने मोठा दणका दिला आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर बेकायदेशीररित्या डिझेल आणि दारूची तस्करी करणाऱ्या एका संशयित जहाजाला कोस्ट गार्डने मध्यरात्री सापळा रचून पकडले आहे.
या कारवाईत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
10 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी कोस्ट गार्डला एका ऑफशोअर ऑईल रिगजवळ विनापरवाना संशयास्पद हालचाली होत असल्याची पक्की गुप्तचर माहिती मिळाली. माहिती मिळताच तटरक्षक दलाने क्षणाचाही विलंब न लावता आपले अत्याधुनिक ऑफशोअर पेट्रोल व्हेसल (OPV) तातडीने त्या दिशेने वळवले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तस्कर पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, मात्र कोस्ट गार्डच्या जवानांनी टॅक्टिकल प्लॅनने त्या जहाजाला घेरले आणि.
जहाजाची कसून झडती घेतली असता त्यात लपवून ठेवलेली बेकायदेशीर विदेशी दारू आणि हिशोब नसलेली तब्बल 10 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. प्राथमिक तपासात हे जहाज बेकायदेशीर डिझेल तस्करीत गुंतले असल्याचा संशय आहे.
कोस्ट गार्डने जहाजासह त्यावरील 6 क्रू मेंबर्सना ताब्यात घेऊन मुंबई हार्बरमध्ये आणले आहे. जहाज आणि आरोपींना पुढील तपासासाठी संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तस्करीमागे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता असून पोलीस, कस्टम आणि इतर समुद्री सुरक्षा यंत्रणांसह संयुक्त तपास सुरू करण्यात आला आहे.



