Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या हातात हात घालून चालणाऱ्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मोजतबा खामेनींच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा, म्हणाले.

दिल्लीमध्ये ब्रिक्स परिषदेची सुरुवात होताच एका छायाचित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन हातात हात घालून चालत असल्याचं हे छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

या छायाचित्राबाबत इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पेझेश्कियन यांनी प्रतिक्रिया देताना, हे मोदींसोबतचे वाढते संबंध आणि दोन्ही देशांमधील जवळीक दर्शवणारे प्रतीक असल्याचं म्हटलं. दरम्यान, त्यांनी मोजताबा खामेनी यांच्याबाबतही खुलासा केला आहे.

“मी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदींसोबतचे आमचे संबंध सातत्याने अधिक चांगले होत आहेत”, असं पेझेश्कियन यांनी सांगितलं. शुक्रवारी ब्रिक्स बिझनेस फोरमच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना पंतप्रधान मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांचा हात हातात घेतला होता. यावेळी त्यांच्या शेजारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षही उपस्थित होते. या छायाचित्रातून जागतिक व्यवस्थेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’ म्हणजेच धोरणात्मक स्वायत्ततेची भूमिका अधोरेखित झाली.

२०२४ मध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पेझेश्कियन यांचा भारताचा हा पहिलाच दौरा आहे. पेझेश्कियन यांनी भारतासोबतचे संबंध दररोज अधिक मजबूत करण्यासाठी इराण प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून असलेल्या सांस्कृतिक संबंधांचाही त्यांनी उल्लेख केला.

“भारत आणि इराणमध्ये खोलवर रुजलेले सांस्कृतिक संबंध आणि प्रदीर्घ इतिहास आहे. काळ बदलला तरी हे संबंध कधीही बदलणार नाहीत”, असं पेझेश्कियन यांनी स्पष्ट केलं. तेहरान आणि नवी दिल्ली यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत झाल्यास जगात वाढत असलेल्या एकाधिकारशाहीला तोंड देण्यास मदत होऊ शकते, असंही पेझेश्कियन यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याचा अप्रत्यक्ष रोख अमेरिकेकडे असल्याचं मानलं जातं.

‘मोजतबा खामेनी जिवंत आहेत’

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पेझेश्कियन यांनी ते जिवंत असून आपले काम करत आहेत, असं स्पष्ट केलं. “अमेरिकेने आमच्या बहुतांश नेत्यांना लक्ष्य केलं आहे. मोजतबा जिवंत आहेत आणि आपले काम करत आहेत. अमेरिका मोजतबा यांचा ठावठिकाणा शोधू शकलेली नाही. त्यामुळेच ते चुकीचा प्रचार करत आहेत”, असा दावा पेझेश्कियन यांनी केला.

फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांत इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य ठार झाल्यानंतर मोजतबा यांनी सर्वोच्च नेत्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र त्यानंतर मोजतबा सार्वजनिकरित्या फारसे दिसलेले नाहीत किंवा त्यांनी सार्वजनिकपणे वक्तव्यही केलेले नाही. त्यांना कोमात ठेवण्यात आले असून या हल्ल्यांमध्ये ते गंभीर जखमी झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी यापूर्वी मोजतबा यांचा चेहरा विद्रूप झाल्याचा दावा केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *