Navgan News



Add Space

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रात्री बर्थडे सेलिब्रेशन, पहाटे घेतला गळफास..

Spread the love

नागपूर : कामात, अभ्यासात हुशार… स्वभावही बोलका. लहानपणापासून ताे येथील मोठे वडिलांकडे शिकला. रविवारी (दि. ३०) त्याचा वाढदिवस होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने सर्वांसोबत हसत-खेळत ‘बर्थडे सेलिब्रेशन’ केले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गळफास घेत त्याने आत्महत्या केली. स्थानिक ऑफिसर कॉलनी येथे २३ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.
श्रेणिक बाबाराव लांबाडे (२३) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे शेखापूर ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथील मूळ रहिवासी हाेता. मृत श्रेणिक लहानपणापासूनच भिवापूर येथील ऑफिसर कॉलनीत राहणारे मोठे वडील तुकाराम ठाकरे यांच्याकडे शिकला. त्यामुळे शहरात त्याचे मित्र व परिचितांची यादी मोठी आहे. मागील दीड वर्षापूर्वी तो आपल्या शेखापूर येथे आई-वडिलांकडे राहायला गेला होता. आता उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने महिनाभरापूर्वी श्रेणिक भिवापूर येथे माेठ्या वडिलांकडे आला हाेता.

घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ताे लगतच्या मेंढेगाव येथे मित्रांसाेबत डेकोरेशनच्या कामात होता. घरी परतल्यानंतर श्रेणिकने कुटुंबीय व मित्रांसाेबत केक कापत वाढदिवस साजरा केला. जेवण केल्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत तो मोबाइल बघत होता. कुटुंबीय झोपी गेल्यानंतर श्रेणिकने स्टोअर रूममध्ये छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा प्रकार दिसून येताच कुटुंबीयांनी हंबरडा फाेडला. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. भिवापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या सुपुर्द करण्यात आला. त्याच्यावर शेखापूर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *