
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, असं राज यांनी उद्धव यांना उद्देशून म्हटलं आहे.
झी २४ तास या वृत्तवाहिनीशी मुलाखतीदरम्यान त्यांनी हे भाष्य केलं.
भाजपशी मनसेची युती होईल किंवा होणार नाही. पण यापूर्वी तुम्ही उद्धव ठाकरेंना किंवा त्यांनी तुम्हाला कधी टाळी देण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं त्याचं विश्वास ठेवण्यासारखं नाहीए काही. इतर लोकांचं मला वाईट वाटतं पण हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही”
आत्ताच्या शिवसेनेत मराठीच्या बाबतीत काहीच नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबतच त्या सर्व गोष्टी गेल्या. रझा अकादमीनं जेव्हा मुंबईत धुडगुस काढला होता. पाकिस्तानी कलाकारांना आम्ही हाकलून दिलं होतं. आत्ता भोंग्यांचा विषयही आम्हीच बंद केला. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा मी चालवतोय असं मला वाटतं, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.