जगासाठी दिलासा! अमेरिका-इराण तणाव १०७ दिवसांनी संपला, ‘होर्मुझ’ पुन्हा खुली होणार, ट्रम्प यांची शांती कराराची घोषणा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे शत्रुत्व संपल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, इराणसोबतचा करार पूर्ण झाला आहे आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, आता होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल आणि या भागात अमेरिकन नौदलाने घातलेली नाकेबंदी उठवली जाईल. हा करार शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये अंतिम केला जाणार असून, इराणनेही यासंदर्भात घोषणा केली आहे. करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये ६० दिवसांची युद्धबंदी लागू होईल आणि त्यानंतर अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू होतील.
ट्रम्प यांची ‘ट्रुथ’वर घोषणा
‘ट्रुथ’ (Truth) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी करारात सहभागी असलेल्या सर्व पक्षांचे आभार मानले. इराणने हा करार झाल्याची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही वेळातच, दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्ताननेही कराराची पूर्तता झाल्याची पुष्टी केली.
ट्रम्प म्हणाले, “मी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ विनाअडथळा खुला करण्याची घोषणा करत आहे. तसेच, मी होर्मुझमधून अमेरिकन नौदल मागे घेत आहे. जगातील जहाजे आता त्यांची इंजिने सुरू करू शकतात; तेलाचा व्यापार सुरळीत चालू द्या.” एका वेगळ्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी संकेत दिले की, शुक्रवारी कराराला अधिकृत अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर होर्मुझ खुला केला जाईल.
इराणचे म्हणणे काय?
इराणच्या उप-परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, शुक्रवारी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी झाल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या ६० दिवसांच्या वाटाघाटी या अमेरिकेकडून तीन आश्वासने पूर्ण करण्यावर अवलंबून असतील; विशेषतः इराणचा गोठवलेला अब्जावधी डॉलर्सचा निधी मुक्त करणे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काझिम गरीबाबादी यांनी सांगितले की, या आश्वासनांमध्ये नौदलाची नाकेबंदी उठवणे, युद्धाची स्थिती आणि लष्करी कारवाया थांबवणे व इराणचा गोठवलेला निधी मुक्त करणे यांचा समावेश आहे.
गरीबाबादी म्हणाले, “६० दिवसांच्या वाटाघाटींची सुरुवात अमेरिकेकडून आश्वासने पूर्ण करण्यावर अवलंबून आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, एकदा का इराणने या पावले उचलल्याची विशेषतः आर्थिक वचनबद्धता पूर्ण झाल्याची खात्री केली, की तांत्रिक कार्यगटाच्या सहभागासह वाटाघाटी त्वरित सुरू होतील.
दोन्ही देश कारवाई त्वरित थांबवण्यास सहमत
हा करार झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’ वर लिहिले, “दीर्घ वाटाघाटींनंतर, अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर शत्रुत्वाची कारवाई त्वरित आणि कायमस्वरूपी थांबवण्यास दोन्ही बाजू सहमत झाल्या आहेत.”



