
आंबेवाल्याने आणलेली आंब्याची कॅरेट नालीच्या शेजारी ठेवली होती. त्याचा धक्का लागून एक कॅरेट नालीत पडला आणि त्या कॅरेट मधले आंबे नालीत बुडाली होती. त्यांनतर तीच आंबे विक्रेत्याने पुन्हा विक्रीसाठी ठेवल्याचं आढळून आले. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळतोय.
बीड : बीडमध्ये सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय, ज्या व्हिडिओमध्ये चक्क आंबेवाला आंबे नाल्याच्या पाण्यात धुवून विक्रीसाठी ठेवत आहे.व्हिडिओ आहे बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या बाजारतळ परिसरातील. या बाजारतळालगत काही आंब्यावाले हातगाडे लावतात. तर याच परिसरात हा आंबेवाला चक्क नालीतल्या पाण्याने आंबे धुऊन कॅरेटमध्ये भरताना दिसतोय आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.उन्हाळ्याचे दिवस आणि आंब्याचा सीझन आहे, त्यामुळं आंब्याच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे विक्री करण्यासाठी आले आहेत. त्या आंब्याचा आस्वाद घेत नागरिक मोठ्या प्रमाणात हे आंबे खरेदी करायला येत आहेत. मात्र आंब्यावाल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं आंब्यावाल्यांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं चित्र समोर आलंय.