Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

शिरूर : या चौकाचा गणपती, त्या गल्लीचा गणपती, शेजारी – शेजारी दोन मंडळांच्या गणपतीचे मंडप आणि एका मंडळात वाद झाल्याने फुटून त्याच परीसरात दुसऱ्या मंडळाची स्थापना असे चित्र सार्वजनिक गणेशोत्सवात सर्रास दिसत असताना महागणपतीच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेल्या रांजणगाव गणपती (ता.

शिरूर) व परीसरातील तब्बल २५ गावांत आजही ‘एक गाव एक गणपती’ हीच प्रथा पाळली जाते. शेकडो वर्षांची ही प्रथा स्थानिक ग्रामस्थांनी मनोभावे जपली असताना वाढत्या औद्योगिकरणाच्या निमीत्ताने वाढलेल्या लोकवस्तीतूनही महागणपतीलाच आराध्य दैवत मानून गणेशोत्सव साजरा केला जातो.

भाद्रपद गणेशोत्सव हा रांजणगाव गणपती येथे साजरा होणारा वर्षातील सर्वात मोठा सोहळा असून सार्वजनिक गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या, तीन ते चार दिवस आधी हा सोहळा सुरू होतो. या सोहळ्यांतर्गत महागणपतीची करडे येथील दोनलाई, निमगाव म्हाळुंगी येथील ओझराई, गणेगाव खालसा येथील आसराई आणि ढोकसांगवी येथील मुक्ताई देवीच्या मंदिरात पालखी काढली जाते. रांजणगावसह या चारही गावातील हजारो गणेशभक्त या पालखीसोबत पायी प्रदक्षिणा करतात.

या चारही गावांसह समस्त रांजणगावकरांचे महागणपती हेच आराध्य दैवत असल्याने आणि गावात या दैवताचे महास्थान असल्याने स्वतंत्रपणे गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा विषयच येत नसल्याची या भागातील ग्रामस्थ व भाविकांमध्ये धारणा आहे. त्यातूनच रांजणगावसह करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा व ढोकसांगवी या गावांत गणेशोत्सवामध्ये कुठेही स्वतंत्रपणे गणपती न बसविता महागणपती मंदिरात होणाऱ्या भाद्रपद गणेशोत्सवातच सर्वजण हजेरी लावतात, असे जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात आले. सुमारे दीडशे वर्षांहून अधिक काळापासून आमचे गणेशोत्सवातील हेच नितीनियम असून, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यानंतरही या परंपरेत कुठेही बाधा आली नसल्याचे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव व पुजारी प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

रांजणगाव, करडे, निमगाव, गणेगाव, ढोकसांगवीसह सोनेसांगवी, खंडाळे, बाभुळसर खुर्द, निमगाव भोगी, कारेगाव, सरदवाडी, कर्डेलवाडी या मोठ्या गावांमध्येही एखाद – दुसरा अपवाद वगळता ‘एक गाव एक गणपती’ हाच उपक्रम राबविला जातो. लहान मोठ्या २५ गावांसह त्यातील वाड्या – वस्त्यांवरही गणपती बसविला जात नाही. या भागातील सर्व ग्रामस्थ महागणपतीच्या भाद्रपद गणेशोत्सवातच भक्तीभावाने सहभागी होतात.

रांजणगावात महागणपतीचे प्राचीन मंदिर असून, हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान आहे. ज्या गावात गणपतीचे मंदिर आहे, त्या गावात किंवा त्या परीसरात शक्यतो घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही, असे शास्त्र सांगते. याच परंपरेचा भाग म्हणून रांजणगाव व परिसरात महागणपतीलाच आराध्य दैवत मानून स्वतंत्रपणे गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. त्यामुळे सार्वजनिक मंडळे सुद्धा अस्तित्वात येऊ शकली नाहीत. राजेंद्र देव

माजी मुख्य विश्वस्त, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट

भाद्रपद गणेशोत्सवात गर्दीचे, वाहनाचे व एकूणच परिस्थितीचे संयोजन करण्यासाठी आम्ही आवश्यक पोलिस बंदोबस्त नेमतो. त्यासाठी बाहेरूनही कुमक मागवावी लागते. मात्र तीन – चार दिवसांचा हा सोहळा संपल्यानंतर आमच्यावर फारसा ताण राहात नाही. कारण रांजणगावसह आमच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांश गावात गणपती बसविले जात नाही. त्यामुळे आमचे पोलिस पुणे किंवा इतरत्र बंदोबस्तासाठी पाठविले जातात.

कुमार कदम, पोलिस निरीक्षक, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे

व्यवसाय व कामधंद्याच्या निमीत्ताने करडे, ढोकसांगवी परीसरातील अनेक कुटूंबे शिरूरला स्थायिक झाली आहेत. मात्र, महागणपतीलाच आराध्य दैवत मानून इमाने इतबारे पूजाअर्चा करण्याची परंपरा आम्ही काहीसे दूर येऊनही जपली आहे. ढोकसांगवी हे मूळ गाव असताना शिरूर शहरात स्थायिक होऊनसुद्धा स्वतंत्रपणे गणपती न बसवता आम्ही गणेशोत्सवात महागणपतीचीच पूजा अर्चा करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *