दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा”; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासात कधी न घेणारे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत.
असे असले तरी या नेत्यांवर करण्यात येणारी टिप्पणी महाराष्ट्राला आणि समाजाला पटत नाही. मराठा समाजाला दिलेला न्याय हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या काळात मिळाला आहे. आंदोलकांना विनंती राहील की, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे योग्य नाही, असे प्रतिपादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा शनिवारी पंधरावा दिवस आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जायचे आहे. १५ सप्टेंबरला मुंबईसाठी अंतरवाली येथून निघणार. रस्त्यात कोणी कितीही खुन्नस दिली तरी त्याला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवू नका; डोळ्यांसमोर समाजाची वेदना आणि मुलांचे भविष्य ठेवा. कोणत्याही मार्गाने गेलो तरी यंदा जिंकूनच यायचे आहे, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मराठा आंदोलन यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
राज्यातील दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा आहे
गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन करणे हे मुंबईकर आणि राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी कठीण आहे. मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सर्व आंदोलकांना विनंती राहील की, या काळात कुणी मुंबईत आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे कुणी आंदोलन करू नये, असे सांगत मनोज जरांगे पाटील हे काय करतात किंवा त्यांच्या भूमिकेपेक्षा राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये थोडा कमी पाऊस आहे. पीक करपत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ काळात कशी मदत आणि त्यांच्या पाठीशी उभे राहता येईल, ही महत्त्वाची बाब आपल्यासमोर आहे. राज्याच्या दुष्काळाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या आहे. सर्व राज्याचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जी नियमावली आहे त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले



