
मराठवाड्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारलेली दडी आता थेट शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला बळी गेला असून हाता-तोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत जळताना पाहून गोजेगावच्या 60 वर्षीय महिला शेतकरी कमलबाई कांदे यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
ऐन पोळ्याच्या दिवशी या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंगोलीत चालू वर्षात 1 जानेवारी ते आजपर्यंत तब्बल 44 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची भीषण आकडेवारी समोर आली आहे.वाढता दुष्काळ आणि प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे.
ऐन पोळ्याचा सण संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असताना हिंगोलीच्या गोजेगाव येथे कमलबाई कांदे यांच्या घरातून मात्र आक्रोश ऐकू येत होता. चार एकर शेतात सावकारी कर्ज आणि व्यापाऱ्यांकडून उधारीवर बियाणे आणून त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, सलग 45 दिवस पावसाचा एक थेंबही पडला नाही. उभे पीक करपून गेले, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि लागवडीचा खर्च कसा भागवायचा? याच चिंतेत कमलबाईंनी शेतातच विष प्राशन केले.
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कमलबाई यांच्या शेतातील सोयाबीन करपल्याने पोळा सण कसा साजरा करायचा या चिंतेत सापडल्या होत्या आपलं कसं होईल बैलांना साज नाही देवाला फोडायला नारळ नाही कोणी उसन वारीने पैसे सुद्धा देत नाही पेरणीसाठी किल्ले कर्ज कसे फेडायचे यातून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे. पावसाअभावी तब्बल 3 लाख 43 हजार हेक्टरवरील पिके पुरती धोक्यात आली आहेत. सोयाबीन आणि कापूस करपून गेला आहे. चालू वर्षात आठ महिन्यांच्या काळात एकट्या हिंगोलीत 44 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. या भीषण परिस्थितीवर राजकीय वर्तुळातूनही तीव्र संताप व्यक्त केला जात असून, हिंगोली जिल्हा तत्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पीक विमा वेळेवर न मिळणे, बँकांची कर्जवाटपातील अनास्था आणि निसर्गाची अवकृपा यामुळे हिंगोलीतील बळीराजा पुरता खचला आहे. आता तरी शासन-प्रशासन जागे होऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदतीचा हात देणार का, हाच मोठा प्रश्न आहे



