Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी, माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार!

कोल्हापूरकरांसाठी आणि विशेषतः नांदणी मठाच्या भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून उपचार आणि देखभालीसाठी जामनगर येथील ‘वनतारा’ प्रकल्पात असलेल्या ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापुरात परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्चस्तरीय समितीने माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात पाठवण्यास अधिकृत परवानगी दिली आहे.

‘वनतारा’मध्ये सुरू होते उपचार

नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीची प्रकृती आणि तिच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर, न्यायालयाच्या निर्देशानुसार तिला गुजरातमधील ‘वनतारा’ या प्राणी कल्याण केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तेथे तिच्यावर वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होती. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होत आल्याने तिला सन्मानाने मूळ ठिकाणी परत आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

कायदेशीर सोपस्कारानंतर माधुरी हत्तीणीची कोल्हापूरला होणार रवानगी

वनतारा प्रशासनाकडून सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रे आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर माधुरी हत्तीणीची कोल्हापूरकडे रवानगी केली जाईल. लाडकी माधुरी हत्तीण पुन्हा मठात परतणार असल्याचे समजताच नांदणी मठाचे भाविक आणि कोल्हापूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

नांदणी मठ राज्यात लोकप्रिय

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात प्राचीन, ऐतिहासिक आणि जैन धर्मियांचे आद्यपीठ म्हणून नांदणी मठाची ओळख आहे. हा मठ १२०० ते १३०० वर्षांहून अधिक जुना असल्याचे सांगितले जाते. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील तब्बल साडे सातशेहून अधिक गावांचा आध्यात्मिक आणि धार्मिक केंद्रबिंदू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *