राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल, कलाकारांना केलं आवाहन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर आयोजित करण्याच्या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा दिल्लीहून गुजरातला हलवण्यामागचं कारण काय, असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच चित्रपटसृष्टीत मोठं योगदान असलेल्या महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणासारख्या राज्यांमध्ये हा सोहळा का आयोजित करण्यात आला नाही असा सवालही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, दादासाहेब फाळके यांच्या महाराष्ट्रात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा का होत नाही? चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारांची परंपरा दिल्लीहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय नेमका कोणत्या कारणासाठी घेण्यात आला, हे स्पष्ट झालं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘राष्ट्रीय पुरस्कारांची उज्ज्वल परंपरा का मोडली जातेय?’
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा देशाच्या राजधानीत आयोजित करण्याची अनेक दशकांची परंपरा आहे. ही परंपरा अचानक का मोडली जात आहे असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या मते, हा मुद्दा केवळ केवाडिया किंवा गुजरातमधील एखाद्या शहराचा नाही तर राष्ट्रीय पुरस्कारांच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या परंपरेत बदल का केला जात आहे हा आहे.
‘गुजरातकेंद्रीकरणाचा प्रयत्न?’
राज ठाकरे यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांचा तसेच प्रकल्पांचा उल्लेख करत देशात गुजरातकेंद्रीकरण होत असल्याचा आरोप केला. कॉमनवेल्थ स्पर्धा, 2023 क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना, परदेशी राष्ट्राध्यक्षांच्या भेटी आणि GIFT City सारख्या प्रकल्पांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करतानाच आता दिल्लीचं महत्त्वही कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. देशातील महत्त्वाच्या संस्थात्मक आणि राष्ट्रीय कार्यक्रमांचं केंद्र एका राज्याकडे झुकवण्याची ही प्रक्रिया योग्य नसल्याचं त्यांनी सूचित केलं.



