Beed Crime News : बोगस कामाच्या बिलावर सही नाकारली; बीडमध्ये इंजिनिअरने ग्रामरोजगार सेवकाला थेट घरात घुसून चोपले

बीडमध्ये बोगस कामाच्या बिलावर सही करण्यास नकार दिल्याच्या रागातून ग्रामरोजगार सेवकाला घरात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेवराई तालुक्यातील खांडवी येथे ही घटना घडली.
ग्रामरोजगार सेवक जालिंदर शेजुळ यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
जालिंदर शेजुळ यांनी केलेल्या आरोपानुसार, इंजिनियर गणेश कोल्हे यांनी काही लोकांना सोबत घेऊन त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेनंतर ग्रामरोजगार सेवकांमध्ये संतापाचे वातावरण असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

नेमका वाद कशावरून झाला?
खांडवी गावातील सुमारे 18 लाख रुपयांच्या 2 पेपर ब्लॉक रस्त्यांच्या कामांवरून हा वाद झाल्याचे जालिंदर शेजुळ यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात कामे न करताच त्यांची बिले उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कामांचे इस्टिमेटही चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मेजरमेंट बिल दुसऱ्या इंजिनियरकडून करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
गावात प्रत्यक्ष कामे झालेली नसल्याने आपण संबंधित बिलावर सही करण्यास नकार दिला. याच कारणाचा राग मनात धरून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप शेजुळ यांनी केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी जालिंदर शेजुळ यांनी केली आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्याने या प्रकरणाची पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.