स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ ; कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनानंतर महावितरणचे माघारीचे आश्वासन

डहाणू: पालघर जिल्ह्यासह राज्यभरात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला विरोध तीव्र झाला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल जास्त येत असल्याचा आरोप करत भारत कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) नेतृत्वाखाली गुरुवार १० सप्टेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
भरपावसात झालेल्या या आंदोलनात सुमारे ५ ते ६ हजार नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान महामार्गावरील वाहतूक साधारण दीड ते दोन तास रोखून धरल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय नेते अशोक ढवळे, डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसह इतर स्थानिक संघटनांनीही पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग नोंदवला. पालघर जिल्ह्यासह लगतच्या भागातूनही नागरिक मोठ्या संख्येने या निदर्शनासाठी उपस्थित झाले होते.
महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना न देता सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने नागरिक आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष निर्माण होत आहे. सध्या बसवलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुनेच मीटर बसवावेत अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. यापूर्वी डहाणू येथे झालेल्या आंदोलनादरम्यान शेकडो स्मार्ट मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांनंतर महावितरणने हे मीटर पुन्हा सक्तीने लावल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून पक्षाकडून पुन्हा आंदोलक भूमिका घेण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी १२:३० ते २:३० दरम्यान दोन तास झालेल्या या रास्ता रोको आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. महावितरणकडून जुन्या मीटरच्या बिलांची पडताळणी करून बिले कमी करण्यासाठी १५ दिवसांची विशेष मोहीम राबवण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नाही असे आश्वासन महावितरण विभागाने लेखी पत्राद्वारे दिली. तसेच ज्या ठिकाणी जुने मीटर आहेत तिथे नवीन मीटर लावले जाणार नाहीत अशी माहिती आमदार निकोले यांनी दिली. आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली.



