गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

कराड (जि. सातारा) : सार्वजनिक गणेश मंडळांना महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या विभागाला नियमावली घालून देवून त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे महाप्रसादासाठी एफडीएच्या परवानगीची आवश्यकता असणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाने मंडळांना एका दिवसाच्या महाप्रसादासाठी तात्पुरता परवाना देण्याचा महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे. त्यासाठी संबंधित विभागाने एक अर्ज तयार केला असून तो मंडळाचे अध्यक्ष किंवा अन्य कोणीही भरुन तो कार्यालयाच्या मेलवर पाठवावा. त्याचबरोबर महाप्रसादाच्या परवान्यासाठी एफडीएच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळांकडून अन्नदानावर भर देण्यात येतो. त्याअंतर्गत अनेक मंडळांकडून दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त मुंढे यांनी त्या महाप्रसादाच्या आयोजनापूर्वी त्यासाठी एफडीएची परवानी घेणे आवश्यक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महाप्रसाद आयोजन करणाऱ्या मंडळांपुढे तो परवाना घ्यायचा कसा, त्यासाठीची कार्यवाही काय असेल याबाबत उत्सुकता आहे.
त्याचा विचार करुन अन्न व औषध प्रशासन विभागाने गणेश मंडळांची गैरसोय होऊ नये आणि परवानगीच्या प्रक्रियेत सुलभता येण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मंडळांना एका दिवसाच्या महाप्रसादासाठी तात्पुरता परवाना देण्याचा दिलासादायक मार्ग एफडीएने काढला आहे. त्यासाठी संबंधित विभागाकडून स्वतंत्र अर्ज तयार करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधी हा अर्ज भरून आवश्यक माहिती नमूद करून संबंधित कार्यालयाच्या ई-मेलवर पाठवू शकतात.
त्याचबरोबर महाप्रसाद परवान्यासाठी एफडीएच्या संकेतस्थळावर नोंदणी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मंडळांनी ऐनवेळी धावपळ करण्याऐवजी महाप्रसादाचे नियोजन करतानाच परवानगीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवात हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करताना स्वच्छता व अन्न सुरक्षेच्या निकषांचे पालन होणे अत्यावश्यक आहे.
त्याच पार्श्वभूमीवर एफडीएकडून ही नियमावली लागू करण्यात आली आहे. दरम्यान, परवानगीची प्रक्रिया कठीण न करता ती सुलभ करण्यासाठी प्रशासनाने तात्पुरत्या परवान्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मंडळांना द्यावी लागणार ‘ही’ माहिती
गणेश मंडळांना महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाने एक अर्ज तयार केला आहे. तो अर्ज भरुन द्यायचा आहे. त्यामध्ये स्वयंपाक करणाऱ्याचे नावे, एफडीएचा परवाना असल्याचा नंबर, व्यवसाय प्रकार, आयोजक मंडळ, संस्थेचे नाव, प्रसादाची तारीख, वेळ, अन्न पदार्थांचा तपशील, दुग्धजन्य-नाशवंत पदार्थांची समावेश असेल तर त्याची माहिती, पाण्याचा स्त्रोत, तपासणी अहवाल, अन्न हाताळणाऱ्यांची संख्या, अन्न सुरक्षा पर्यवेक्षकाचे नाव, तयार अन्नाची ४८ तास जतन करण्याची व्यवस्था, कच्या मालाच्या पुरवठादरांची नावे व परवाना नंबर आदी माहिती भरावी लागणार आहे.
अशी करावी लागेल कार्यवाही
- मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महाप्रसादासाठी अर्ज करावा
- एफडीएच्या अर्जातील आवश्यक बाबींची माहिती द्यावी
- महाप्रसाद परवान्यासाठी ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज करावा
- एफडीएकडून स्टॉल होल्डर कॅटॅगिरीमधून मिळणार तात्पुरता परवाना
- केवळ १०० रुपये भरुन काढता येणार परवाना
- मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी एफडीएकडून तोडगा
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवादरम्यान महाप्रसादासाठी मंडळाचे अध्यक्ष किंवा सदस्यांच्या नावाने एफडीएने तयार केलेला अर्ज भरुन कार्यालयाच्या [email protected] किंवा [email protected] या मेलवर आयडीवर मेल करावा. त्यानंतर परवान्यासाठी festivals.mahafda.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करुन १०० रुपये शुल्क भरावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडळांना महाप्रसादासाठी ऑनलाईन परवाना प्राप्त होईल.



