एकनाथ शिंदेंच्या फाडफाड इंग्रजीने ब्रिटनची ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ दुमदुमली; “लाभले आम्हास भाग्य..”

विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल, मेट्रो किंवा उंच इमारती नव्हेत; विकास म्हणजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संधी पोहोचवणे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येणे,” अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.
लंडन : ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. यावेळी ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी हाऊस ऑफ लॉर्ड्सचा परिसर दुमदुमून गेला.
या ऐतिहासिक सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून केली. त्यानंतर इंग्रजीतून भाषण करत त्यांनी महाराष्ट्राचा विकास, नागरिक-केंद्री प्रशासन, महिला सक्षमीकरण आणि भारत-ब्रिटन संबंध यावर आपली भूमिका मांडली.
‘हा माझा नव्हे, महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा सन्मान’ –
पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी हा सन्मान केवळ आपला नसून महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या कष्टांचा, आकांक्षांचा आणि राज्याच्या विकासाचा गौरव असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन या त्रिसूत्रीवर महाराष्ट्राची विकासयात्रा उभी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुरेश भटांच्या कवितेतून ‘मराठी’चा अभिमान –
ब्रिटनच्या संसदेत मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करताना शिंदे यांनी कवी सुरेश भट यांच्या प्रसिद्ध ओळी उद्धृत केल्या.
‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी…’
या ओळींच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची ओळख आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली.
‘आई आणि पत्नीच्या कष्टांतून सामान्यांसाठी काम करण्याची प्रेरणा’ –
आपल्या बालपणाच्या आठवणी सांगताना शिंदे यांनी आपण सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असल्याचे सांगितले. आई आणि पत्नीला दिवसरात्र कष्ट करताना पाहिल्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यातील अडचणी आणि वेदना समजल्या, असे त्यांनी म्हटले. “माझ्या डोळ्यांसमोर आई आणि पत्नीने केलेले कष्ट आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातले अश्रू मला माहिती आहेत,” असे सांगत त्यांनी आपल्या लोककेंद्री राजकारणामागची भूमिका स्पष्ट केली.
‘लाडकी बहीण’ योजनेचा विशेष उल्लेख –
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि नागरिकांना सरकारी सेवा घरापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा शिंदे यांनी विशेष उल्लेख केला. “मला माझी एक बहीण आहे; पण लाडकी बहीण योजनेमुळे मला करोडो बहिणी मिळाल्या,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत असून त्याचा परिणाम कुटुंबाचे आरोग्य, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून पाच कोटींहून अधिक नागरिकांना विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
‘विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल आणि मेट्रो नव्हे’ –
“विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल, मेट्रो किंवा उंच इमारती नव्हेत; विकास म्हणजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संधी पोहोचवणे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येणे,” अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग, ट्रान्सजेंडर धोरण, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांसारख्या उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.
‘मोदी व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर’ –
महाराष्ट्राच्या विकासाची गाथा मांडताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. नरेंद्र मोदी हे भारताचे ‘व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर’ असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारत आणि ब्रिटनमधील संबंध नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत असल्याचे सांगताना ब्रिटनमध्ये राहणारे ७० हजारांहून अधिक महाराष्ट्रीय नागरिक हे दोन्ही देशांमधील महत्त्वाचा मानवी दुवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई-लंडन सहकार्याच्या मोठ्या संधी –
मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असल्याचे सांगत शिंदे यांनी **फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचा भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे १४ टक्के वाटा असून देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्र आकर्षित करत असल्याचे त्यांनी सांगितले. वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, अटल कोस्टल ब्रिज आणि मुंबई कोस्टल रोड यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘मी मुख्यमंत्री नाही, मी एक सामान्य माणूस आहे’ हा मुख्यमंत्रीपदाच्या काळातील आपला दृष्टिकोन आजही कायम असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची आपली बांधिलकी त्यांनी व्यक्त केली. यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह ब्रिटनचे मंत्री, खासदार, महापौर, राजदूत, उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.



