भारतीय जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! ट्रम्प यांनी इराणवर खापर फोडलं; वातावरण तापलं…

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण यांच्यात रविवारी होणाऱ्या संभाव्य कराराच्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय आक्रमक विधान केलं आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून इराणला इशारा दिला असून फसवणुकीचा आरोप केला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीच्या जवळ भारतीय जहाजांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांचा उल्लेख करत ट्रम्प यांनी इराणवर सडकून टीका केली आहे.
मागील चार दिवसांत होर्मुझच्या आसपास तीन भारतीय जहाजांवर हल्ले झाले असून त्यात तीन खलाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात संताप व्यक्त होत आहे. भारतीय जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल ट्रम्प यांनी वेगळाच दावा केला आहे. कालच्या रात्री इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, असा सनसनाटी दावा ट्रम्प यांनी केला. भारतीय जहाजांवरील हल्ल्यांमागे अमेरिका नसल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं.
काल रात्री होर्मुझ सामुद्रधुनीतून निघणाऱ्या भारतीय जहाजांवर इराणकडून ड्रोन हल्ला करण्यात आला होता. पण तो निष्फळ ठरवण्यात आला, असा दावा ट्रम्प यांनी केला. भारतीय जहाजांवरील हल्ल्यांसाठी ट्रम्प यांनी इराणला जबाबदार धरलं. भारतीय जहाजांवरील हल्ले आता खपवून घेणार नाही. इराणनं आपलं वर्तन लवकरात लवकर सुधारायला हवं, असं ट्रम्प म्हणाले.
इराणकडून माध्यमांमध्ये लीक करण्यात आलेल्या कराराच्या अटी त्यांना फेटाळून लावल्या. इराणनं लीक केलेल्या अटी, शर्तींचा कराराशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही. इराणकडून कराराच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या विधानांमध्ये जराही सत्य नाही. त्यांच्याकडून केली जाणारी वक्तव्यं बिनबुडाची आहेत, असं ट्रम्प यांनी म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या मुत्सद्देगिरीवरही तिखट हल्ला केला. इराण अतिशय विश्वासघातकी असून त्यांच्या सोबतच्या चर्चेत प्रामाणिकपणा कुठेही नसतो. इराणचा पवित्रा अतिशय लज्जास्पद असल्याची टीका ट्रम्प यांनी केली. अमेरिकेसोबत करार करताना होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपलं नियंत्रण सोडणार नसल्याचा दावा इराणच्या सरकारी माध्यमांनी केलेला आहे. यावरुन ट्रम्प यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.



