भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील नरेंद्र पवार, शैलेंद्र पाटील यांचा पोलिसांकडून शोध सुरू

भिवंडी तालुक्यातील बापगाव हद्दीतील एका शेतघरात भाजपचे कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस शैलेंद्र पाटील यांनी एका २२ वर्षाच्या विवाहितेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे.
या पीडित महिलेच्या आरोपावरून पडघा पोलिसांनी पवार, पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही इसम फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके राज्याच्या विविध भागात त्यांचा शोध घेत आहेत.
राज्याच्या पोलीस महासंचालक, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पडघा पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. हा गुन्हा घडलेल्या बापगाव येथील शेतघरातील सीसीटीव्ही चित्रणातील चित्रिकरण या गुन्ह्याच्या तपासातील महत्वाचा भाग आहे. पोलिसांनी शेतघराला असलेले सीसीटीव्ही आणि सीसीटीव्हीचा विस्तृत आवाज नोंदणी यंत्र (डिव्हीआर) शोधण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही गोष्टी घटनास्थळावरून गायब आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील इसमांच्या साथीदारांनी हे कृत्य केले असण्याचा संशय पोलिसांना आहे.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, त्यांचा साथीदार बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील हे या गुन्ह्यातील मुख्य इसम आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय पोलीस तपासाला गती येणार नसल्याने पडघा पोलिसांकडून गेल्या पाच दिवसापासून त्यांचा विविध भागात शोध सुरू आहे. या शेतघराचा काळजी वाहक देवा देखील फरार असल्याचं पोलीस तपासात समोर आले. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीमधून या गुन्ह्याच्या तपासाला वेग येणार आहे.
पडघा पोलिसांनी नरेंद्र पवार, शैलेंद्र पाटील यांच्या शोधासाठी सहा पोलीस पथक तयार केली आहेत. हे दोन्ही इसम परदेशात पळून जाऊ नये म्हणून मुंबईतील विमानतळांवर दोन विशेष पोलीस पथके तैनात आहेत. मुंबई शहर परिसरातील रेल्वे स्थानकांवर या दोन्ही इसमांसाठी पोलिसांनी पाळत ठेवली आहे. हे दोन्ही इसम कुठे लपून बसले आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करावे. या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र तयार करून या आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत आणि पीडित महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या कल्याणमधील नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी केली आहे.



