Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सेलू तालुक्यात सर्वच जलस्रोत कोरडे; यंदा ‘श्रीं’चे विसर्जन कुठे करावे?; गणेशभक्तांना चिंता

पावसाळा संपत आला तरी सेलू तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे नदी-नाले, विहिरी, तलाव, बंधारे कोरडेठाक पडल्याने यंदा गणेश विसर्जन कुठे करणार, असा प्रश्न सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशभक्तांसमोर निर्माण झाला आहे.

यंदा मोठ्या भक्तिभावाने गणेशाची स्थापना करण्यात आली. मात्र, गणेशोत्सवाच्या काळातही पावसाने पाठ फिरवल्याने उत्सवावर दुष्काळाचे सावट आहे.

अनेक गावांत पारंपरिक विसर्जनस्थळे असलेली नदीपात्रे, तलाव, बंधारे, विहिरी पाण्याअभावी कोरड्याठाक आहेत. सेलू शहरात ५३ सार्वजनिक गणेश मंडळे असून, त्याशिवाय १५ हजारांहून अधिक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागणार आहे. मात्र, शहरासह तालुक्यातील नैसर्गिक जलस्रोतांतात पाणीच उपलब्ध नसल्याने विसर्जनाची पर्यायी व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

गणेश विसर्जनासाठी गावागावांत नदी, नाले, तलाव, बंधारे, विहिरींचा वापर केला जातो. मात्र, यंदा हे जलस्रोत कोरडेठाक असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. कृत्रिम विसर्जन हौद, पाण्याची टाकी किंवा अन्य पर्यायी व्यवस्था प्रशासन व ग्रामपंचायतींनी तातडीने करावी, अशी अपेक्षा गणेशभक्तांनी केली आहे.

उत्सवावर दुष्काळाचे सावट

पावसाअभावी शेतकरीवर्गही मोठ्या संकटात सापडला आहे. खरीप पिकांची अवस्था बिकट झाली असून ग्रामीण भागातील उत्सवावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अनेक ठिकाणी साधेपणाने साजरा होत आहे. आता गणेश विसर्जनासाठी प्रशासनाकडून कोणती व्यवस्था केली जाते, याकडे ५३ सार्वजनिक गणेश मंडळांसह हजारो गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. विहिरीतील गाळ काढून स्वच्छता, आवश्यक ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात येतील. नागरिकांनीही पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *