भारतापेक्षा दुबईत नवीन आयफोन खरंच स्वस्त मिळतोय का? विमान तिकीट, व्हिसा अन् इतर खर्चाचे गणित काय?

गेल्या आठवड्यात ॲपल कंपनीने आपल्या नवीन आयफोनची भारतात अधिकृतपणे विक्री सुरू केली. त्यामध्ये ‘आयफोन १८ प्रो’ (iPhone 18 Pro) आणि ‘आयफोन १८ प्रो मॅक्स’ (iPhone 18 Pro Max) या दोन मॉडेलचा समावेश आहे.
अपेक्षेप्रमाणे या नव्या फोनच्या खरेदीसाठी भारतीयांनी देशभरातील ॲपल दुकानांबाहेर प्रचंड गर्दी केली. मुंबई आणि दिल्लीसह अनेक प्रमुख शहरांतील दुकानांबाहेर अनेकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून आले. त्याचवेळी हे दोन्ही आयफोन भारतापेक्षा दुबईत अधिकच स्वस्त मिळत असल्याचे आवई समाजमाध्यमांवर उठली. त्यानंतर अनेकांनी थेट परदेशवारी करून स्वस्तात आयफोन खरेदी केल्याचा दावा केला; पण त्यांचे हे आर्थिक गणित खरंच बरोबर आहे का? दुबईला जाऊन आयफोन खरेदी केल्यास पैशांची प्रत्यक्षात बचत होते की अधिकचा भूर्दंड पडतो? त्याविषयी जाणून घेऊ…
ॲपल दुकानांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
ॲपल ही मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात आघाडीची कंपनी मानली जाते. त्यामुळे या कंपनीचा फोन बाजारात दाखल होताच अॅपलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. गेल्या आठवड्यात ॲपलने आपल्या नवीन आयफोनची मालिकेची भारतात अधिकृतपणे विक्री सुरू केली. नेहमीप्रमाणे पहिल्याच टप्प्यात आयफोन विकत घेण्यासाठी तंत्रज्ञानप्रेमींनी देशभरातील दुकानांबाहेर प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. त्यातच रांगेत सर्वात पुढचा नंबर असावा म्हणून अनेकांनी आदल्या रात्रीपासूनच आयफोन दुकानांबाहेर तळ ठोकल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान आयफोनची विक्री सुरू झाल्यानंतर ग्राहकांचे अजब किस्सेही ऐकायला मिळाले. दिल्लीतील एका व्यक्तीने आयफोन खरेदीसाठी थेट घरातील सोने विकल्याचा दावा केला. आपण सोने विकूनच आयफोन १८ प्रो खरेदी करायला आलो असल्याचे त्याने माध्यमांना सांगितले. दुसरीकडे- मुंबईतील एका दुकानाबाहेर उभ्या असलेल्या आयफोनप्रेमीने आपण हा फोन खरेदी करण्यासाठी थेट गुजरातच्या सुरत येथून आल्याचे सांगितले. आयफोन हातात येईपर्यंत मी इथून जाणार नाही, असा निर्धारच त्याने केला होता.
दुबईत आयफोन खरंच स्वस्त मिळतोय का?
एकीकडे भारतात आयफोन खरेदीसाठी अनेकजण तासनतास रांगेत उभे असतानाच दुसरीकडे पैशांच्या किमतीतला फरक पाहून काहींनी थेट दुबईतून फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. केरळचे रहिवासी असलेले मोहम्मद सय्यद हे गेल्या आठवड्यात त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दुबईत गेले होते. तिथे विक्रीला असलेल्या आयफोनची त्यांनी भारतात मिळणाऱ्या किमतीची तुलना केली. त्यात मोठा फरक दिसून आल्यानंतर त्यांनी दुबईतूनच आयफोन १८ प्रो मॅक्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला. गल्फ न्यूजशी बोलताना मोहम्मद सय्यद म्हणाले की, गेल्या आठवड्यात मी येथे कुटुंबाला भेटायला आलो होतो. त्यावेळी दोन्ही देशांतील आयफोन किमतींची तुलना केल्यानंतर मला येथेच फोन घेणे फायदेशीर वाटले. दुबईतून हा नवा आयफोन घेतल्यामुळे आपली जवळपास २०,००० ते ३०,००० रुपयांची बचत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत की दुबई, कुठे स्वस्त मिळतोय आयफोन?
सध्या भारत आणि दुबईत मिळणाऱ्या आयफोनच्या किमतींबाबतची समाजमाध्यमांवर जोमाने चर्चा सुरू आहे. भारतात आणि दुबईत हे फोन नेमके किती रुपयांना मिळतात आणि हा फरक किती मोठा आहे, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. सध्या भारतात ‘आयफोन १८ प्रो’ या मॉडेलची सुरुवातीची किंमत एक लाख ६४ हजार ९०० रुपये इतकी आहे. तर दुबईत हेच मॉडेल ५,०९९ दिरहम (अंदाजे १,३३,०५२ रुपये) मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच दोन्ही किमतींमध्ये जवळपास ३१ हजार ८४८ रुपयांचा फरक आहे. तसेच आयफोन ‘१८ प्रो मॅक्स’ या मॉडेलची भारतातील किंमत एक लाख ७९ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते, तर दुबईत हाच फोन ५,४९९ दिरहम म्हणजेच भारतीय चलनात एक लाख ४३ हजार ४४१ रुपयांना विकला जात आहे. याचाच अर्थ हे दोन्ही आयफोन भारताच्या तुलनेत दुबईत अधिकच स्वस्त दराने मिळत आहे. दोन्ही देशांमधील किमतीत असलेल्या या तफावतीचे मुख्य कारण कररचना असल्याचे दिसून येते. दुबईत केवळ पाच टक्के मूल्यवर्धित कर (VAT) लागू आहे. याउलट, भारतात स्मार्टफोनवर लागणारे आयात शुल्क, जीएसटी आणि इतर स्थानिक करांचे प्रमाण अधिक असल्याने त्याच्या अंतिम किमतीतही मोठा फरक दिसून येतो.
दुबईतून आयफोन खरेदी करणे खरंच परवडणारे आहे का?
भारताच्या तुलनेत दुबईत आयफोन लक्षणीयरीत्या स्वस्त मिळत असले तरी केवळ फोन खरेदीसाठी तिथे जाणाऱ्यांना विमान प्रवासाचे तिकीट आणि व्हिसाचा खर्चही विचारात घ्यावा लागेल. एका जागतिक संकेस्थळानुसार, भारतातून दुबईला जाणाऱ्या विमानाचे सर्वात स्वस्त तिकीट सुमारे २४ हजार ७८१ रुपये इतके आहे. इतर संकेस्थळावर विमान तिकिटांचे दर २९ हजार ते ३० हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे दिसून आले आहे. या प्रवासाच्या तिकिटासोबतच व्हिसाचा खर्च आणि स्थानिक प्रवासाचा खर्च जोडला, तर फोनच्या खरेदीतून होणारी ३१ ते ३६ हजार रुपयांची बचत बहुतांश प्रवासातच खर्च होते. त्यामुळे केवळ फोन खरेदीसाठी दुबईची वारी करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. तरीही आधीच दुबई दौऱ्यावर असलेल्यांसाठी तिथून आयफोन खरेदी करणे नक्कीच फायद्याचे ठरत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.



