फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, थेट 20-22 हजार रुपये मिळणार? नितेश राणे काय म्हणाले?

राज्य सरकारच्या धडाकेबाज निर्णयाची मालिका सुरूच आहे. आज राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे नवीन घोषणा केली आहे. नितेश राणे यांची ही घोषणा मच्छिमारांसाठी आहे.
मच्छिमारांना संकटात मदत करण्याची ही घोषणा आहे. संकट काळात मच्छिमारांना थेट आर्थिक मदत देण्याचं सूतोवाच राणे यांनी केलं आहे. त्यामुळे मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे.
मासेमारी जेव्हा नसते त्या कालावधीत आम्ही काय करु शकतो? या संबधी आम्ही विचार करतोय. माश्यांच्या प्रजनन काळात मासेमारी बंद राहते. त्यामुळे मच्छिमारांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं. म्हणून त्यांना दिलासा देणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळेच मच्छीमारांना आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 20-22 हजार रुपये आर्थिक अनुदान देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा निर्णय लवकच जाहीर करण्यात येणार असल्याचं नितीश राणे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेच ब्रँड अॅम्बेसेडर
उद्धव ठाकरे यांनी दुष्काळावरून राज्य सरकारवर टीका करताना तुमसे ना हो पायेगा, अशी टीका केली. त्यावरून नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीका केली. अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी काय केलं ते सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे तुमसे ना हो पायेगा अशी विधाने त्यांनी करू नये. तुमसे ना हो पायेगाचे ब्रँड अम्बेसेडरच उद्धव ठाकरे आहेत, अशी टीका राणेंनी केली.
शेतकऱ्यांना दिलासा देणार
राज्यात काही भागात निश्चितपणे पाऊस कमी पडला आहे. चिंतेची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सरकारची भूमिका सांगितली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येत आहे. त्यासाठी येत्या 5 ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तर आदित्य अडचणीत
यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केलं. दिशा सालियन प्रकरणात चौकशी सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणात लक्ष घातलं आहे. तसेच कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणावर भाष्य करणं योग्य नाही. निष्पक्षपणे चौकशी होत असल्याने त्यावर बोलून चौकशीत अडथळा आणता कामा नये ही आमची भूमिका आहे, असं सांगतानाच संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे या प्रकरणावर वारंवार बोलत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.



