महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान: सोलापूर जिल्ह्यातील सात नद्यांचा समावेश, ‘कासाळगंगा’ पॅटर्न राज्यभर राबवणार

सोलापूर । राज्यातील नद्यांचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि भावी पिढ्यांचे जलभविष्य सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियाना’त आता सोलापूर जिल्ह्यातील सात प्रमुख नद्यांचा समावेश करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने वर्धा येथून ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानांतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील १०८ नद्यांचा अभ्यास पूर्ण झाला असून, सोलापूर जिल्ह्यातील जलदूत व जलमित्रांनी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार आता प्रत्यक्ष कामांना प्रशासकीय पातळीवरून मोठी गती दिली जाणार आहे.
नद्या निर्मळ आणि प्रवाही करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यास जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जलबिरादरीचे सत्यनारायण बोलशेट्टी, नरेंद्र चुग, डॉ. सुमंत पांडे आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर उपस्थित होते.
सोलापूरातील या नद्यांचा समावेश…
या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील भीमा (चंद्रभागा), सीना, मानगंगा, आदिला, दुबदुबी, कोरडा आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘कासाळगंगा’ या नद्यांच्या कायापालटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पारंपरिक ज्ञान असलेले अभ्यासक, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सहभागाने प्रत्येक नदीचा सविस्तर लोकअभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे. या उपाययोजनांच्या आधारे जलसंपदा विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा समन्वयाने संवर्धनाचे काम हाती घेणार आहेत.
‘कासाळगंगा’ पॅटर्न राज्यभर लागू होणार
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात राबवलेला कासाळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रयोग पथदर्शी ठरला आहे. सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर या तीन तालुक्यांतील २३ गावांतून वाहणाऱ्या या नदीचे कटफळ ते शेळवे या ४२ किलोमीटर अंतरावरील पुनरुज्जीवन लोकसहभाग, लोकवर्गणी आणि ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून यशस्वी झाले. यामुळे पूर व दुष्काळ नियंत्रणाचे महत्त्वपूर्ण काम साध्य झाले असून, केंद्र शासनाने या प्रकल्पाला ‘राष्ट्रीय जल सुवर्णपदक’ देऊन गौरवले आहे. हाच यशस्वी पॅटर्न आता राज्यातील इतर नद्यांच्या कामासाठी आधारभूत मानला जाईल.
नाशिकमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा…
प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यापूर्वी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक येथे विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा व संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यभरातील जलदूत, जलमित्र आणि कार्यकर्त्यांना त्यासंदर्भात सूचना लवकरच देण्यात येईल. त्याबाबतचा शासन आदेश लवकरच निघणार आहे.
“कासाळगंगा नदीचे पुनरुज्जीवन लोकसहभागातून यशस्वी ठरले. वैजनाथ घोंगडे व सहकाऱ्यांनी लोकवर्गणी आणि सीएसआर निधीतून हे काम उभे केले. देशाने गौरवलेले हेच प्रारूप राज्यातील इतर नद्यांच्या कामासाठी निश्चितपणे दिशादर्शक ठरेल.



