
राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षांच्या गोटात सध्या एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अंतर्गत घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रात सत्ताधाऱ्यांशी मुकाबला करण्यासाठी स्थापन झालेल्या विरोधकांच्या आघाडीत अंतर्गत वाद आणि अस्वस्थता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर बदललेली राजकीय गणिते, जागावाटपावरून उद्भवलेले मतभेद आणि मित्रपक्षांमधील ताणतणाव यामुळे आघाडीचे भविष्य अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे.
प्रादेशिक पातळीवर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या प्रमुख पक्षांमध्ये काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. दक्षिण भारतापासून ते थेट पूर्व आणि पश्चिम भारतापर्यंत प्रादेशिक नेत्यांच्या सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि संवादामुळे राष्ट्रीय पातळीवर नवा पर्याय आकारास येतोय का, याकडे विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. कोणत्याही जाहीर घोषणेशिवाय सुरू असलेला हा संवाद देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून द्रमुकच्या (DMK) खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथील निवासस्थानी सुमारे ८० मिनिटे बंददाराआड चर्चा केली. या भेटीपूर्वीच कनिमोझी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. काँग्रेससोबत निर्माण झालेल्या दुराव्यानंतर कनिमोझी, ममता बॅनर्जी आणि सुप्रिया सुळे या तीन मातब्बर महिला नेत्यांच्या संपर्कातून काँग्रेसला वगळून एका नव्या ‘तिसऱ्या आघाडी’ची चाचपणी सुरू असल्याचा हा मोठा राजकीय दावा आता देशाच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरला आहे.



