ममतांच्या गटाला नवं नाव, दिदींचा ठाकरे स्टाईल डाव; नवीन चिन्हही मिळालं, माजी CM खेला करणार?

दिल्ली/कोलकाता: केंद्रीय निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवं आणि नवं चिन्ह दिलं आहे. तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं काल रात्री घेतला. त्यानंतर दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्हं देण्यात आली आहेत. आयोगानं ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ नाव आणि ‘फुटबॉल खेळाडू’ चिन्ह दिलं आहे. तर बंडखोर गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ नाव आणि ‘लिफाफा’ चिन्ह दिलं आहे. पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवून संकटात सापडलेलं राजकारण जोमानं पुढे नेण्याचं आव्हान ममता बॅनर्जी यांच्या समोर असेल.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून फॉर्म बीच्या अंतर्गत दाखल करण्यात येणाऱ्या उमेदवारी अर्जांना ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’चे उमेदवार मानलं जाईल. या उमेदवारांमध्ये रबीउल आलम चौधरी, नंदिग्रामहून संचिता प्रधान आणि आसामच्या नगाव लोकसभा मतदारसंघातून अब्दुल सलाम यांचा समावेश आहे. या उमेदवारांना फुटबॉल खेळाडू निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे.
दुसरीकडे अरुप रॉय यांच्याकडून अधिकृत फॉर्म बीच्या आधारावर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’चे अधिकृत उमेदवार समजलं जाईल. त्यानुसार सफिउज्जमान शेख आणि नंदिग्राम विधानसभा मतदारसंघातून एहतेशमुल हक यांना लिफाफा निवडणूक चिन्ह मिळालं आहे. पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर दोन्ही गटांना नवं नाव आणि नवं चिन्ह दिलं गेलं आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर बहुतांश आमदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली. पक्षात बंड झालं. या बंडाचं नेतृत्त्व ऋतब्रत बॅनर्जी यांनी केलं.
ममता बॅनर्जी यांच्याकडे निवडणूक आयोगानं नव्या नावासाठी पर्याय मागितले होते. ममता बॅनर्जी हीच पक्षासाठी महत्त्वाची ओळख असल्यानं आणि त्यांनीच पक्ष स्थापन केल्यानं नव्या नावासाठी आयोगाला पर्याय देताना ममतांनी विशेष काळजी घेतली. उद्धव ठाकरेंनी शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यावर पक्षाच्या नव्या नावात स्वत:चा उल्लेख केला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळवलं. त्याच प्रकारे ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नव्या नावात स्वत:चा उल्लेख केला आहे. त्यांचा पक्ष आता ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या नावानं ओळखला जाईल.



