Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

प्रांताधिकाऱ्यांच्या विरोधात तलाठ्यांची आख्खी फौज एकवटली, निलंबन मागे घेण्याची मागणी करत दिला कामबंदचा इशारा

फेरफार नोंदी आणि महसूल कामकाजात अनियमितता असल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक मंडलाधिकारी व पाच तलाठ्यांवर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपूरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी निलंबनाची कारवाई केली.

तसेच वेतनवाढ रोखण्यात आली. या कारवाईविरोधात आता नाशिक जिल्हा तलाठी संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व तलाठी पवन दत्ता यांच्याविरोधात एकवटले आहेत. प्रांताधिकारी दत्ता यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप तलाठ्यांनी केला आहे. तलाठ्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात मंगळवारपासून (दि. १५) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा तलाठी संघाने शुक्रवारी (दि. ११) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी तलाठ्यांकडून पवन दत्ता मनमानी करत असून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला.

निलंबनाची कारवाई करणाऱ्या तलाठी तसेच मंडलाधिकाऱ्याला कारवाईपूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. खुलासा न मागवताच कारवाई केल्याने ती बेकायदेशीर असल्याचे संघाचे म्हणणे आहे. त्याउलट दत्ता यांच्याकडून धमक्या दिल्या जात असून महिला कर्मचाऱ्यांशी अरेरावी भाषा वापरत असल्याचा आरोप संघटनेने केले आहे.त्र्यंबकेश्‍वर येथे नुकत्याच पार पडलेल्या नियोजित बैठकीत पवन दत्ता हे चार जणांवर कारवाई करणार होते. पण, तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेत दत्ता यांचा डाव हाणून पाडल्याचा दावा संघटनेने केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामध्ये निलंबन व वेतनवाढ रोखण्याची कारवाई मागे घ्यावी. तसेच दत्ता यांची तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास १५ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. तरीही न्याय न मिळाल्यास १६ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व तलाठी सामूहिक रजा घेऊन कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संजय गाडे, उपाध्यक्ष मोहन गायकवाड व प्रीती अग्रवाल तसेच सरचिटणीस अरुण फसाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *