Nashik Dubere-Bhagur road 344 crore approval | डुबेरे – भगूर रस्ता, बोरखिंड इंटरचेंजसाठी ३४४ कोटींची मान्यता

जुन्नर : तालुक्यातील डुबेरे – सोनारी – सोनांबे – शिवडे-पांढुर्ली – विंचुरीदळवी ते भगूर या प्र.जि.मा.-२६ रस्त्याच्या कि.मी. १३/६०० ते २२/९०० या टप्प्यातील कामासह बोरखिंड येथे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या इंटरचेंज बांधकामासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारानंतर राज्य शासनाने ३४३ कोटी ९९ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली.
याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे.
या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे मातीकाम, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण तसेच काँक्रीट रस्त्याची कामे केली जाणार आहेत. त्याचबरोबर चार नवीन मोठे पूल, चार लहान पूल, सात वाहतूक भुयारी मार्ग, पाच बॉक्स कल्वर्ट आणि दोन पाइप कल्वर्ट उभारण्यात येणार आहेत.
रस्त्याच्या कामाबरोबरच संरक्षक भिंती, आरसीसी व कच्चे गटर्स, मुरूम बाजूपट्टी, पेव्हर ब्लॉक, बसथांबा, वृक्षलागवड व सौंदर्गीकरणाची कामे केली जाणार आहेत. आवश्यकतेनुसार सेवा वाहिन्यांचे स्थलांतर आणि भूसंपादनाचाही खर्च प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासही प्राधान्य देण्यात आले आहे.
वन, पर्यावरण तसेच संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घेणे, पुलांच्या आराखड्यांना सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेणे आणि रस्ते बांधकामात इंडियन रोड काँग्रेसच्या सुरक्षा मानकांचे पालन करणे बंधनकारक करायात आले आहे.
भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर काम सुरू होणार
कामाची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, उपलब्ध निधीच्या मर्यादेतच प्रकल्पाचा खर्च करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच आवश्यक भूसंपादन पूर्ण करून जमीन ताब्यात आल्यानंतरच काम सुरू करण्याची अट घालण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या इंटरचेंजसाठी मिळालेली प्रशासकीय मान्यता तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन, उद्योग, शेती व व्यापाराला चालना मिळेल. प्रकल्पाची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो.
सिन्नरच्या वाहतूक व्यवस्थेला मिळणार चालना
सिन्नर तालुक्यातील डुबेरे, सोनारी, सोनांबे, शिवडे, पांढुर्ली, विंचुरदळवी परिसराला भगूर तसेच समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे परिसरातील दळणवळण अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे. बोरखिंड येथील इंटरचेंजमुळे या भागातील वाहतूक आणि औद्योगिक -व्यावसायिक संपर्काला चालना मिळण्याची शक्यता आहे.



