Railway Interesting Facts : रेल्वेची एक बोगी किती रुपयांत तयार होते? किंमत ऐकून बसेल धक्का, एवढ्यात येईल 3BHK फ्लॅट

भारतीय रेल्वेचं सध्या मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण केलं जात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या नेटवर्कची चर्चाही जगभरात होताना दिसते. अनेक देश भारतीय रेल्वेच्या कामकाजातून प्रेरणा घेत आपल्या रेल्वे व्यवस्थेत सुधारणा करत आहेत.
देशात रेल्वेचं जाळं दिवसेंदिवस आणखी वाढत आहे आणि जुन्या व्यवस्थांमध्ये सुधारणा केली जात आहे. आपल्याला कल्पना असेलच की, भारतीय रेल्वे मध्यमवर्गीय प्रवाशांचा विचार करून त्यांच्या बजेटमध्ये विविध प्रकारच्या रेल्वे उपलब्ध करून देते.
वंदे भारत आणि तेजससारख्या वेगवान रेल्वेसोबतच देशात अनेक पॅसेंजर आणि एक्सप्रेस रेल्वेही आहेत, ज्यांचं भाडं तुलनेनं कमी आहे. रेल्वे गाड्या चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करते. रेल्वेच्या इंजिनसोबतच तिच्या डब्यांची निर्मिती करण्यासाठीही मोठी रक्कम खर्च होते. पण तुम्हाला माहिती आहे का, रेल्वेची एक बोगी तयार करण्यासाठी किती रुपये खर्च येतात?
आधुनिक जनरल कोचमध्ये वाढ
PIB नुसार, भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आधुनिक सुविधा असलेल्या जनरल आणि नॉन-एसी कोचचं विक्रमी उत्पादन केलं आहे. या कोचमध्ये प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा देण्यासोबतच प्रवासी क्षमता वाढवण्यात आली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 4,838 नवीन LHB GS आणि नॉन-एसी कोचच्या उत्पादनाचं नियोजन करण्यात आलं आहे. 2026-27 साठी 4,802 LHB कोच तयार करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
अमृत भारत आणि नमो भारत ट्रेन
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये स्लीपर आणि जनरल क्लाससह विविध प्रकारचे नॉन-एसी कोच आहेत. या ट्रेनमधून तुलनेने किफायतशीर दरात चांगल्या सुविधा मिळतात. 2025 मध्ये 13 अमृत भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या. त्यामुळे अमृत भारत ट्रेनच्या एकूण सेवांची संख्या 30 झाली. याशिवाय भुज-अहमदाबाद आणि जयनगर-पटना या मार्गांवर नमो भारत रॅपिड रेल सेवाही सुरू आहेत.
प्रमुख स्थानकांवर वेटिंग एरिया
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा केंद्राच्या यशानंतर देशभरातील 76 स्थानकांवर आधुनिक प्रतीक्षालय विकसित करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील प्रतीक्षालयात सुमारे 7,000 प्रवाशांची व्यवस्था आहे. येथे शौचालय, तिकीट काउंटर, ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन आणि मोफत RO पिण्याच्या पाण्यासारख्या सुविधा आहेत.
रेल्वेची एक बोगी बनवण्यासाठी किती खर्च येतो?
रेल्वेमध्ये प्रामुख्याने जनरल, स्लीपर आणि एसी कोच असतात. रेल्वेचे कोच स्टील आणि अॅल्युमिनियम या दोन्ही धातूंचा वापर करून तयार केले जातात. कोचच्या बाहेरील भागात स्टीलचा, तर आतील भागात अॅल्युमिनियमचा वापर केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका एसी कोचची किंमत साधारण 2.8 ते 3 कोटी रुपये असू शकते. तर स्लीपर कोचसाठी सुमारे 1.25 कोटी रुपये आणि जनरल कोचसाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च येतो.



