युद्धाचा महाभडका! इराणने अमेरिकेचे ‘अपाचे’ हेलिकॉप्टर पाडले, अमेरिकेकडून शक्तीशाली हल्ला…

पश्चिम आशियातील तणाव आता अत्यंत टोकाच्या आणि घातक पातळीवर पोहोचला आहे. हा संपूर्ण प्रदेश आता एका महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ (Strait of Hormuz) इराणने अमेरिकन लष्कराचे प्रगत ‘अपाचे हेलिकॉप्टर’ (Apache Helicopter) पाडल्याचा आरोप करत अमेरिकेने इराणवर थेट आणि भीषण लष्करी हल्ला चढवला आहे.
हल्ल्यानंतर इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअर’ने देखील आक्रमक पवित्रा घेत परिसरात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनद्वारे प्रतिहल्ला केल्याचा दावा केला आहे.
इराणची अनेक शहरे आणि बेटांवर प्रचंड स्फोट
इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन हवाई दलाच्या हल्ल्यांमुळे इराणच्या सिरिक आणि मिनाब शहरांसह केशम बेटावर प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. यानंतर बंदर अब्बास आणि जास्क काउंटी परिसरातही अमेरिकेकडून बॉम्बवर्षाव आणि स्फोट सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अमेरिकेची डिजिटल न्यूज वेबसाइट “एक्सिओस”ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्याने होर्मुज परिसरात असलेल्या इराणच्या अनेक ‘एअर डिफेन्स सिस्टम’ (हवाई संरक्षण यंत्रणा) आणि रडार यंत्रणांना लक्ष्य करत त्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
“हेलिकॉप्टर पाडले, आता उत्तर तर मिळणारच” – ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एबीसी (ABC) न्यूजशी फोनवर बोलताना या हल्ल्याचे जोरदार समर्थन केले. ट्रम्प यांनी म्हटलं की, “अमेरिकेकडून चोख प्रत्युत्तर देणे खूप गरजेचे होते. इराणने आमचे एक अपाचे हेलिकॉप्टर पाडले. सुदैवाने त्यातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. तरीही, युनायटेड स्टेट्स आपल्यावरील हा हल्ला सहन करणार नाही आणि आम्ही त्याचे चोख उत्तर देत आहोत.”
विशेष म्हणजे, हा हल्ला होण्याच्या अवघ्या काही तास आधी ट्रम्प यांनी मिडल ईस्टचे युद्ध संपवण्याची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला होता. मात्र, अपाचे हेलिकॉप्टर पाडल्यानंतर अमेरिकन सेंट्रल कमांडने मांडर-इन-चीफ (ट्रम्प) यांच्या आदेशानुसार इराणविरुद्ध आत्मरक्षार्थ संतुलित लष्करी मोहीम सुरू केली.
इराणचा इशारा
अमेरिकेच्या या विनाशकारी हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून थेट अमेरिकेला युद्धाची धमकी दिली आहे. त्यांनी लिहिले की, “अमेरिकेने आमच्या संयमाची परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. आमच्या शक्तिशाली सशस्त्र सेना कोणत्याही हल्ल्याला किंवा धमकीला चोख उत्तर दिल्याशिवाय सोडणार नाहीत. जर तुम्हाला स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल, तर तातडीने आमचा हा प्रदेश सोडून चालते व्हा.”



