2000 वर्षे जुन्या खाणींचं Location सापडलं; सोनं मिळवण्यासाठी चक्क हलवलेली पृथ्वी; आधुनिक तंत्राशिवाय कसं शक्य झालं?

Gold News : सोनं… जगातील एक मौल्यवान धातू. एक असा धातू, ज्याच्या एक ग्राम वजनासाठीसुद्धा हजारो रुपये मोजावे लागत आहेत. अशा या सोन्याच्या खाणी जगाच्या विविध भागांमध्ये, विविध खंडांमध्ये असून, विशिष्ट भौगोलिक रचनांमध्ये सोन्याचं अस्तित्वं आढळून येतं, ज्याची उदाहरणं बऱ्याचदा पाहायला मिळाली आहेत.
अशाच एका जवळपास 2000 वर्षे जुन्या सोन्याचा खाणीचं मूळ ठिकाण जगासमोर आल्यानं सारेच हैराण आहेत. पुरातत्त्वं विभागाला स्पेनमध्ये या ठिकाणाचा उलगडा झाला असून, निसर्गाचा आविष्कार नव्हे तर, खऱ्या अर्थानं हा एक अद्भूत चमत्कार आहे असंच अनेकांचं म्हणणं.
उंचच उंच डोंगरांच्या उदराशी दडलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी इतिहासाची पाळंमुळं शोधत असताना संशोधकांना स्पेनच्या उत्तरेकडे Guilleteres d’All या नावानं ओळखलं जाणारं ठिकाण सापडलं. हे तेच ठिकाण जे रोमन कालखंडात, साधारण 2000 वर्षांपूर्वी सोन्याची खाण होतं. त्या काळात रोमन समुदायानं अतिशय प्रगत अशा ‘हायड्रॉलिग मायनिंग’च्या माध्यमातून जमिनीतून सोन्याचे साठे मिळवले होते, ज्यामध्ये त्यांनी या डोंगररांगांचा आकारही बदलला, तोसुद्धा निसर्गाला धक्का न पोहोचवता.
एका डोंगरामुळं समोर आलं मौल्यवान रहस्य…
स्पेन आणि फ्रान्समधील सीमाभागात असणाऱ्या Cerdanya Valley इथं या डोंगररांगा असून, निसर्गाची उत्कृष्ट कलाकुसर जणू या डोंगरांवर पाहायला मिळते. पण, सखोल निरीक्षण केल्यास मात्र काही नवे उलगडे होत जातात. पुराततत्वं विभागानं इथं काही चिंचोळ्या वाटा, दगडात तासलेले उतार आणि खोदकाम केलेली क्षेत्र सापडल्याचं सांगत या उत्खननातून इथं 300 मीटर रुंदीचं एक असं क्षेत्र उजेडात आणलं, ज्यामध्ये स्पष्टपणे मानवी हस्तक्षेप दिसून आला.
युनिवर्सिटी ऑफ A Coruña आणि युनिवर्सिटी ऑफ बार्सिलोनातील संशोधकांनी अध्ययन करत उत्खननातून समोर आलेले हे पुरावे रोमन काळातील खाणकामाचे असून, तिथं सोन्यासाठी खाणकाम होत होतं हे स्पष्ट केलं. एक लहानसा प्रयत्न नव्हे तर, हे क्षेत्र एका काळजीपूर्वक आणखणीचा भाग होता असं सांगण्यात आलं.
2000 वर्षांपूर्वी खाणीतून कसं मिळवलं जायचं सोनं?
जमिनीत खोलवर भुयारं खणण्यापेक्षा रोमन कालखंडात सोन्याच्या शोधात खाणींमध्ये खोदकामासाठी पाण्याचा एक प्रभावी उपकरण म्हणून वापर करण्यात आला होता. हायड्रॉलिक मायनिंग असं या तंत्राला संबोधण्यात आलं. या प्रक्रियेमध्ये प्रचंड प्रमाणात जलस्त्रोतांना कालव्यांच्या माध्यमातून सोन्याचे साठे असणाऱ्या ठिकाणांकडे वळवण्यात येत होतं. पाण्याचा साठा एकाच वेळी जेव्हा सोडला जात असे तेव्हा त्याच्या प्रचंड ताकदीनं माती, दगड बाजूला हटत आणि उतारावर असणारे धातूचे साठे उजेडात येत, ज्यातून खाणीत काम करणारे कामगार सोन्याचे खडे गोळा करत. या तंत्राच्या माध्यमातून पृथ्वीच्या उदरात नैसर्गिक क्रियांमुळे दडलेले सोन्याचे अनेक साठे मिळवण्यास मदत झाली आणि रोमन साम्राज्याच्या विकासातही यामुळं सुगीचे दिवस आले.
आश्चर्याची बाब म्हणजे संशोधकांसमोर उलगडा झालेल्या माहितीनुसार या संपूर्ण खाणकामामध्ये साधारण 2 मिलियन क्युबीक मीटर इतका पृथ्वीचाच भाग हलवण्यात आला होता. ज्यामध्ये त्या भूभागाची घनतासुद्धा विचारात घेण्यात आली होती, ज्यासाठी गुरुत्वाकर्षण, पाणी आणि मानवी बळाचा मेळ साधून एकत्रित आणि नियोजित उर्जेचा वापर करण्यात आला होता. आजही या डोंगररांगांमध्ये हजारो वर्षांपूर्वी सोनं मिळवण्यासाठी झालेल्या खाणकामाचे पुरावे आहेत. या उत्खननातून जगातील सर्वात जुनं खाणकाम तंत्र उजेडात आलं असून, मानवाला अभियांत्रिकी ज्ञानाची असणारी जाण नेमकी किती जुनी आहे याचासुद्धा उलगडा झाला असं म्हणायला हरकत नाही.
पुरातत्वं विभागच नव्हे, तर इतिहासकारांनीसुद्धा या भागात असणाऱ्या सोन्याच्या साठ्यांवर उजेड टाकला होता. प्लिनी द एल्डर या रोमन लेखकांनी वर्णन केल्यानुसार या भागाला mineral wealth म्हटलं जात. त्या काळात खाणकाम हे अर्थार्जन आणि त्याहूनही धनाढ्य होण्यासाठी, लष्करी मोहिमांना हातभार लावण्यासाठी, समाजोपयोगी कामांसाठी हातभार लावत होतं. इतकंच नव्हे, तर त्या काळात जगाच्या नजरेआड रोममध्ये सुरू असणारं हे कामसुद्धा उत्खननामुळं उजेडात आलं. थोडक्यात काय, तर सोन्याची किंमत ही तेव्हासुद्धा तितकीच मौल्यवान होती, जितकी ती आज आहे…



