भाजपचा राज ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलानाचा इशारा, मनसे कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली, पण भाजपवाले फिरकलेच नाहीत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसोबत लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी हटवल्यानंतर आता मनसे आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे.
अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजपच्या युवा मोर्चाने त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोर आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमल्याचं दिसून आलं. राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली असून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आव्हानही दिलं आहे.
पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे पोहोचले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेले असता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचं दिसून आलं. मोदींचा फोटो शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत कशाला असा प्रश्न अमित ठाकरे यांनी विचारला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो हटवला. या प्रकरणानंतर अमित ठाकरे आणि मनसेच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाजपचा आंदोलनाचा इशारा
अमित ठाकरेंच्या या कृत्यानंतर भाजप युवा मोर्चा त्यांच्याविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थांनी आंदोलन करण्याची घोषणा दिली. त्यानंतर मनसेचे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनीही राज ठाकरे यांच्या निवासस्थांनी धाव घेतली.
मनसे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे आणि अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थांनी पोहोचले आणि त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं, आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असं संदीप देशपांडे म्हणाले.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दरम्यान, या ठिकाणी मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक बंद करण्यात आली आहे, त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.
नेमकं काय प्रकरण?
पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे हे गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावल्याचं आढळलं. त्यावर मोंदींचा फोटो या ठिकाणी कशाला असा सवाल अमित ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना विचारला. त्यानंतर मनसेच्या प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून काढला.
या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे मनसे कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.



