Stock Market Today: शेअर बाजारात विक्रीचा धडाका; निफ्टी 24,000 वर अडकला, गुंतवणूकदारांची चिंता वाढली

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात काहीशी सुस्त झाली. आज निफ्टीची विकली एक्सपायरी असल्याने बाजारातील हालचालींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीवर दबाव दिसून येत असून, निर्देशांकात जवळपास 50 अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे 24,000 ची महत्त्वाची सपोर्ट पातळी निफ्टी टिकवून ठेवणार का, याकडे बाजाराचे लक्ष आहे.
निफ्टीची सपाट सुरुवात, सेन्सेक्स किंचित मजबूत
आज निफ्टी 3 अंकांच्या घसरणीसह 24,077 वर उघडला. दुसरीकडे, सेन्सेक्स 36 अंकांच्या वाढीसह 76,994 वर खुला झाला. मात्र, बाजार उघडल्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीवर विक्रीचा दबाव वाढताना दिसत आहे.
याआधीच्या सत्रात निफ्टी 95 अंकांनी घसरून 24,080 वर बंद झाला होता. इंट्राडे व्यवहारात निफ्टीने 24,000 ची पातळीही तोडली होती. त्यामुळे आजच्या व्यवहारात ही पातळी टिकते की पुन्हा तुटते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
ग्लोबल मार्केटमध्येही घसरण
भारतीय बाजारासोबतच आशियाई बाजारांमध्येही दबावाचे वातावरण आहे. जपानचा निक्केई सुमारे अर्ध्या टक्क्याने, तर दक्षिण कोरियाचा KOSPI सुमारे 0.8 टक्क्यांनी घसरला आहे.
अमेरिकन शेअर बाजारातही सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मागील सत्रात डाऊ जोन्स 0.7 टक्क्यांनी, तर टेक्नॉलॉजी कंपन्यांचा प्रभाव असलेला नॅस्डॅक 0.12 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे.
बाजारासाठी महत्त्वाचे ठरणारे इतर घटक
शेअर बाजारावर परिणाम करणाऱ्या काही सकारात्मक आणि नकारात्मक घडामोडी सध्या समोर आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मात्र पहिल्या तिमाहीतील GDP आकडेवारी दिलासादायक ठरली आहे.
GDP वाढीचा वेग
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP 7.8 टक्क्यांनी वाढला आहे. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा ही वाढ अधिक आहे. GDP वाढीचा अंदाज 7.2 टक्के होता.
गेल्या वर्षी याच तिमाहीत GDP वाढीचा दर 6.9 टक्के होता. मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन आणि सर्व्हिसेस क्षेत्राच्या कामगिरीचा अर्थव्यवस्थेच्या वाढीला मोठा हातभार लागला आहे.
वित्तीय तूटही कमी
जुलै महिन्यातील वित्तीय तुटीची आकडेवारीही सकारात्मक आहे. वित्तीय तूट 1.87 लाख कोटी रुपयांवरून 1.47 लाख कोटी रुपयांवर आली आहे. त्यामुळे सरकारी वित्तीय व्यवस्थेच्या दृष्टीने हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.
दरम्यान, जून महिन्यातील क्रेडिट ग्रोथमध्येही मोठी वाढ झाली असून, ती एका वर्षात दुप्पट होत 16.5 टक्क्यांवर पोहोचली आहे.
GDP वाढ, वित्तीय तूट आणि क्रेडिट ग्रोथ या तीनही आघाड्यांवरील आकडेवारी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.
कच्च्या तेलाच्या दरात वाढ
दुसरीकडे, अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. क्रूड ऑइलचा दर पुन्हा 91 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचला आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदार या घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत.



