Navgan News

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यानवगण विश्लेषण

तारीख ठरली…! सर्वात मोठी अट इराणला मान्य? ‘पीस टॉक-२’ संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा…

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबादेत झालेली पहिल्या फेरीतील शांतता चर्चा निष्फळ ठरली. आता दुसऱ्या फेरीत काय होते? हे बघण्यासारखे असेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने करारासंदर्भात पुन्हा उत्सुकता दर्शवली आहे.

त्यांनी अमेरिकेला तसा संदेशही पाठवला आहे. तर, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनीही इस्लामाबाद चर्चेत काही प्रमाणात प्रगती झाल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात बोलतान ट्रम्प म्हणाले, “सध्या अमेरिकेने इराणवर कडक नाकेबंदी लागू केली असून त्यांचा कोणताही व्यापार सुरू नाही. इराणकडे कुठल्याही प्रकारची अण्वस्त्रे नसतील. यासाठी ते सहमत नसतील, तर कुठल्याही प्रकारचा करार होणार नाही. आम्ही, कुठल्याही देशाला, जगाला ब्लॅकमेल करण्याची परवानगी देऊ शकत नाही.” दरम्यान, इराणने अणुमुद्यासंदर्भात सकारात्मक कल दर्शवला असून ट्रम्प प्रशासनाला ही चर्चा लांबवण्याची इच्छा नाही, असे जे. डी. व्हान्स यांनी म्हटले आहे.

कुठे आणि केव्हा होऊ शकते दुसऱ्या फेरीची बैठक? –
सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी अंतर्गत तयारी करत आहेत. पुढील आठवड्यात सीझफायरची मुदत संपण्यापूर्वी ही बैठक पार पडू शकते. यासाठी जिनेव्हा आणि इस्लामाबाद ही दोन ठिकाणे चर्चेत असून १६ एप्रिल ही संभाव्य तारीख असू शकते. या प्रक्रियेत तुर्की देखील दोन्ही देशांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

तत्पूर्वी, इस्लामाबादमधील चर्चेदरम्यान, अमेरिकेने इराणला २० वर्षांसाठी युरेनियम संवर्धन थांबवावे आणि देशातून आपला उच्च संवर्धित साठा हटवण्याची अट घातली होती. मात्र, इराणने कमी कालावधीत आणि नियंत्रित पद्धतीने कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता. या मुद्द्यावरील मतभेदांमुळे करार होऊ शकला नाही. मात्र, आता इराण अणुसंवर्धनावर काही तडजोड करण्यास सहमत झाला असल्याचे समोर येत आहे.

सर्वात मोठी अट इराणला मान्य? –
इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेत अमेरिकेने इराणला २० वर्षांपर्यंत युरेनियम संवर्धन बंद करण्याची अट घातली होती, तर इराणने ती कमी कालावधीसाठी असावी असा प्रस्ताव दिला होता. या मुद्द्यावरून मतभेद झाले होते, मात्र आता इराण युरेनियम संवर्धनाच्या अटीवर काही प्रमाणात झुकण्यास तयार झाल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *