Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मराठवाड्यात दुष्काळाची झळ अन् जालन्यात भाजप नेत्यावर ‘नोटांचा पाऊस’! भयंकर प्रकार कॅमेऱ्यात कैद

जालना: सध्या संपूर्ण राज्यात दुष्काळाचे सावट पसरले असून, विशेषतः मराठवाड्यात भीषण पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. हाताशी आलेले पीक करपून गेल्याने, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता यामुळे राज्यातील बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी धाय मोकलून रडताना दिसत आहेत. शेतात राबणारा बळीराजा अश्रू ढाळत असतानाच, जालन्यातून राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बेफिकीरी उघडी पाडणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या माजी आमदारावर नोटाची उधळण होत असलेला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर संताप व्यक्त केला जात आहे.

मंगळवारी, रात्री जालना शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात भव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भजनाच्या तालावर जोरदार ठेका धरला. मात्र, भजनाच्या या उत्साहात कार्यकर्त्यांनी थेट कैलास गोरंट्याल यांच्यावर ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांची उधळण सुरू केली. एकीकडे शेतकरी पाण्यासाठी आणि पिकांच्या नुकसानीमुळे होरपळत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे पैशांची उधळण होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गोरंट्याल यांचा अजब दावा, ”भजनाच्या भक्तीत…”

या सर्व वादग्रस्त घटनेवर भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “भजन कार्यक्रमाच्या आधी आम्ही देवाकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीच प्रार्थना केली होती. भजनाच्या भक्तीत माणूस इतका मंत्रमुग्ध आणि तल्लीन होऊन जातो की, त्या वेळी कोण काय करतो हे कोणाच्याच लक्षात येत नाही”, असा अजब दावा गोरंट्याल यांनी केला आहे.

गोरंट्याल यांनी दिलेले हे स्पष्टीकरण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार असल्याची टीका होऊ लागली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात एका बाजूला शेतकरी हवालदील झाला असताना, राजकीय कार्यक्रमांमध्ये होणारी ही पैशांची उधळपट्टी जनतेच्या पचनी पडताना दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *